मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांतील लोकल प्रवाशांना भविष्यात एमयूटीपी-३ मधील काही महत्त्वाच्या प्रकल्पांव्दारे मोठ्या सुविधा मिळणार असतानाच आता यातीलच पाच महत्त्वाचे प्रकल्प बाजूला ठेवण्याचा निर्णय झाला आहे. तर पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग, ऐरोली-कळवा लिंक रोड आणि विरार-डहाणू पाचव्या-सहाव्या मार्गासह अन्य काही प्रकल्पच रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे एमआरव्हीसीकडून सांगण्यात आले. एमयूटीपी-३मधील पनवेल-कर्जत दुहेरीकरण, ऐरोली-कळवा लिंक रोड, विरार ते डहाणू तीसरा आणि चौथा मार्ग यासह स्थानकांचा विकास, मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील दोन स्थानकांमधील रूळ ओलांडणे रोखण्यासाठी विविध योजना आणि तांत्रिक कामे अशा प्रकल्पांनाच रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्याचा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पांशिवाय एमयूटीपी-३ मधील विरार-वसई-दिवा-पनवेल नवीन मार्ग, हार्बरवरील गोरेगावर ते बोरीवलीपर्यंत विस्तार, बोरीवली ते विरार पाचवा आणि सहावा मार्ग, कल्याण ते कसारा तिसरा आणि चौथा मार्ग, कल्याण ते कर्जत तीसरा आणि चौथा मार्ग या प्रकल्पांबाबत अद्याप तरी काही निर्णय घेण्यात आला नसल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पांबाबत नंतरही विचार केला जाईल, अशी माहिती सहाय यांनी दिली. (प्रतिनिधी)
एमयूटीपी-३ मधील ५ प्रकल्प ‘सायडिंगला’
By admin | Updated: January 13, 2015 05:32 IST