पवनी (भंडारा) : पवनी वनपरिक्षेत्रातील वायगाव वनबिटात पट्टेदार वाघाची सापळा रचून शिकार केल्याप्रकरणी कुख्यात आंतरराष्ट्रीय व्याघ्र तस्कर कुट्टू पारधी आणि त्याच्या चार साथीदारांना तीन वर्षाचा सश्रम कारावास व विविध कलमांतर्गत प्रत्येकी ४५ हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. पवनी न्यायालयाचे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस. एस. सय्यद यांनी मंगळवारी हा निकाल दिला.कुट्टू पारधीला आॅक्टोबरमध्ये उत्तरप्रदेशातील लखीमपूर जंगलात पकडण्यात आले होते. सध्या तो रासनलाल चंदन तस्करीच्या प्रकरणात कर्नाटकच्या हावेरी कारागृहात बंद होता. तेथून आणून मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. दुपारी १.५० वाजता न्यायाधीश सैय्यद यांनी कुट्टू पारधी व रासनलाल व इतर तीन आरोपींना भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ कलम ५०९ (८५) अंतर्गत दोषी ठरवून शिक्षा सुनावली. कुट्टू पारधी वगळता सर्व आरोपींनी दोन वर्षापर्यंत कारावास भोगल्यामुळे त्यांची आता एक वर्षाची शिक्षा शिल्लक आहे. कुट्टू पारधी मध्यंतरी फरार झाल्यामुळे त्याची १ वर्ष ९ महिने २ दिवस शिक्षा भोगणे शिल्लक आहे. (प्रतिनिधी)२सर्व न्यायालयीन कारवाई आटोपल्यानंतर दुपारी १.५० वाजता न्यायाधीश सय्यद यांनी सर्व आरोपींना बोलावून आदेशाची प्रत दिली. हे सर्व आरोपी सत्र न्यायालयात अपील करणार असल्याचे अॅड. एल. के. देशमुख यांनी सांगितले. आज सकाळी ११.२५ वाजता भंडारा कारागृहातून आरोपी जक्कू पारधी, बेनीराम पारधी, शैलेश पारधी यांना चोख पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले.
पाच जणांना तीन वर्षांची शिक्षा
By admin | Updated: April 19, 2017 02:44 IST