सुरेश लोखंडे, ठाणेशैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या आदिवासी, दुर्गम क्षेत्रांतील मुलामुलींसाठी राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या ४३ ह्यमॉडेल स्कूलह्ण व ह्यगर्ल्स होस्टेलह्णचे बांधकाम केले जाणार आहे. त्यात पालघर जिल्ह्याचा समावेश असून पाच शाळांसाठी सुमारे २५ कोटी रुपये खर्च करून पाच तालुक्यांमध्ये या मॉडेल स्कूल बांधण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाद्वारे आदिवासी, दुर्गम भागांत या संपूर्ण इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यात येणार आहेत.पालघर जिल्ह्यात सुमारे पाच एकरांच्या भूखंडावर प्रत्येक शाळेच्या दोन मजली इमारतीसह मुलींसाठी वसतिगृह बांधण्यात येणार आहे. या बांधकामासाठी आधी तीन कोटी दोन लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. पण, आता यासाठी सुमारे पाच कोटी रुपये खर्चाची मर्यादा देण्यात आली असल्याचे सर्वशिक्षा अभियानाच्या बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता थोरात यांनी सांगितले. या इंग्रजी माध्यमाच्या ह्यमॉडेल स्कूलह्णमध्ये सहावी ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहे. जव्हार तालुक्यातील विनवळ येथेही मॉडेल स्कूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी वनखात्याने जागेला मान्यता दिली आहे. डहाणू तालुक्यातील बाडा-पोखरण येथील गुरचरणच्या पाच एकर जागेत ही शाळा बांधली जाणार आहे. विक्रमगड तालुक्यातील मलवाडा व वाकी येथील प्रत्येकी अडीच एकर भूखंडावर ही शाळा होणार आहे. तलासरी तालुक्यातील पाटीलपाडा येथील जिल्हा परिषदेच्या भूखंडावरही शाळा उभी राहणार आहे. मोखाडा तालुक्यातील पुलाचीवाडी येथे बांधण्यात येणाऱ्या या शाळेच्या जागेला मात्र अद्याप वनखात्याची मान्यता मिळालेली नाही. वनहक्क कायद्याखाली एका शेतकऱ्यास सुमारे आठ एकर जागा देण्यात आली आहे. त्यातील सुमारे पाच एकर जागा शाळेस देणे शक्य आहे. मात्र, त्यासाठी वनविभाग अद्याप मान्यता देत नसल्याचे उघड झाले आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी पाच ‘मॉडेल स्कूल’
By admin | Updated: March 30, 2015 02:35 IST