मनोहर कुंभेजकर, मुंबईससून डॉकमध्ये अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशामुळे आणि ‘लोकमत’च्या दणक्यामुळे मासळीच्या वजनासाठी सुरू होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वजन काटा वापराला व्यापारी आणि दलालांनी नकार दिला आहे. त्यामुळे आता मच्छीमारांनी गेल्या १५ नोव्हेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. परिणामी येथील मासेमारी व्यवहार ठप्प झाला आहे. शासनाच्या वैद्यमापन विभागातर्फे २७ नोव्हेंबरच्या सरकारी अध्यादेशान्वये इलेक्ट्रॉनिक वजन काटा वापरण्याचे नियंत्रक, वैद्यमापनशास्त्र विभागाचे संचालक राकेश पांडे यांनी आदेश दिले होते. व्यापाऱ्यांनी याला नकार दिला असून, त्यांना आता एका महिन्याची मुदत हवी आहे. या बेमुदत संपामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या मासे विक्री करणाऱ्या महिला, खलाशी, बर्फ विक्रेते, मासळी घेऊन जाणारे टेम्पो, हातगाड्या, कामगार वर्ग अशा सुमारे एक लाख लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी शासनदरबारी मध्यस्थी करून न्याय द्यावा, अशी मागणी काँग्रेसच्या मत्स्यव्यवसाय सेलचे राज्य समन्वयक रामदास संधे यांनी केली.
इलेक्ट्रॉनिक वजन काट्याविरोधात मच्छीमारांचा संप
By admin | Updated: December 8, 2014 02:56 IST