ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 29 - मुंबईसह मराठवाडा, विदर्भ सध्या कडाक्याचा उकाडा आहे. यामुळे लोकांना घराबाहेर पडणं मुश्किल झालं आहे. यातच बीडमध्ये उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. रुपाबाई पिसळे (67)यांचा उष्माघातामुळे बळी गेला आहे. रुपाबाई पिसळे या नांदुरघाटातील रहिवासी होत्या.
रुपाबाई पिसळे बीड येथे आल्या असता दुपारी त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. रात्री साडे 9 च्या सुमारास स्थानिकांना त्या मृतावस्थेत आढळल्या. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पंचनामा करुन मतदान कार्डच्या आधारावर रुपाबाई यांची ओळख पटवली. तातडीने या घटनेची माहिती त्यांच्या नातेवाईकांनाही देण्यात आली आहे.
दरम्यान, मंगळवारी रायगडमध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. रायगड जिल्ह्यातील भीरा येथे तब्बल 46.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. यानंतर अकोला येथे सर्वाधिक 43.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर चंद्रपूरमधील तापमान 43.2 अंश सेल्सिअस इतके होते.
मराठवाडा, विदर्भात उष्णतेची लाट कायम असून पुढील 24 तासांत अशीच परिस्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
मुंबईतही तापमानात वाढ झाल्यानं नागरिक हैराण झाले आहे. मुंबईत मंगळवारी सकाळी कुलाबा येथे 32.2 अंश से., तर सांताक्रूझमध्ये 35 अंश से. तापमानाची नोंद करण्यात आली. दरम्यान, पुढील 24 तासांत मुंबईतील तापमान 35 अंश से.पर्यंत राहील, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे.