‘एलएलबी’ अभ्यासक्रम : निकाल की जादू ?नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ढिसाळ कारभाराचा फटका ‘एलएलबी’च्या विद्यार्थ्यांना बसला आहे. तीन वर्षीय ‘एलएलबी’च्या चौथ्या सेमिस्टरच्या (सीबीएस) निकालात एकाच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना चक्क दोन विषयांत सारखे गुण देण्याची बाब ‘लोकमत’ने समोर आणली होती. या अभ्यासक्रमाचा सुधारित निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आणखी मोठा धक्का बसला आहे. ‘टॉपर’च्या यादीत असलेल्या विद्यार्थ्यांना सुधारित निकालांत अनुत्तीर्ण घोषित करण्यात आले आहे. गुणांमध्ये प्रचंड तफावत आढळून आली आहे. ही बाब थोड्याथोडक्या नव्हे तर अनेक विद्यार्थ्यांसोबत झाली असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. यामुळे निकालातील ‘मॅजिक’मागील रहस्य आणखी वाढले आहे.‘एलएलबी’च्या चौथ्या सेमिस्टच्या निकालात जे विद्यार्थी परीक्षेत अनुपस्थित होते, त्यांना चक्क गुण देण्यात आले आहेत तर ज्या विद्यार्थ्यांना नेहमीच चांगले गुण मिळत होते, त्यांना अनुपस्थित दाखविण्यात आले होते. ‘लेबर लॉ-२’ आणि ‘पब्लिक इंटरनॅशनल लॉ’ या दोन्ही विषयांत ७० हून अधिक विद्यार्थ्यांना सारखे गुण देण्यात आल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणली होती. विद्यापीठाने त्यानंतर तातडीने संकेतस्थळावरुन निकाल काढून घेतला व सुधारित निकाल जाहीर केला. परंतु सुधारित निकाल पाहताच विद्यार्थी बुचकळ्यातच पडले. ‘लेबर लॉ-२’व ‘पब्लिक इंटरनॅशनल लॉ’या दोन्ही विषयांसोबतच इतरही विषयांत विद्यार्थ्यांचे गुण बदलले. जे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले होते ते थेट अनुत्तीर्ण झाले आहेत. इतकेच काय पण ‘टॉपर्स’मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना चक्क अनुत्तीर्ण दाखविण्यात आले आहे. काही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले नसले तरी अगोदरच्या तुलनेत त्यांचे गुण कमी झाले आहेत. केवळ एकच महाविद्यालय नव्हे तर बहुतांश सर्वच महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसोबत असे प्रकार झाले आहेत, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांनी प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांना भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु ते बैठकीत व्यस्त असल्याने भेटू शकले नाही. यासंदर्भात परीक्षा नियंत्रक विलास रामटेके यांच्याशी संपर्क केला असता अशा प्रकारची कुठलीही तक्रार आली नसल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)चूक झाली कुठे?निकालात गुणांसंदर्भात झालेल्या ‘मॅजिक’साठी निकालांचे तांत्रिक काम पाहणाऱ्या ‘प्रोमार्क’ कंपनीसह दोन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली होती. मानवी चुकीमुळे ही चूक घडली होती . त्यानंतर सुधारित निकाल लावण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु सुधारित निकालानंतर विद्यार्थ्यांच्या गुणांत प्रचंड तफावत आढळून आल्याने नेमकी चूक झाली कुठे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
आधी पास नंतर नापास !
By admin | Updated: August 7, 2014 01:05 IST