जितेंद्र कालेकर, ठाणेसूरज परमार यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केलेले ते चौघे नगरसेवक पोलीस कोठडीतील शनिवारच्या पहिल्या रात्रीच्या मुक्कामातच हैराण झाल्याची माहिती समोर आली आहे. डासांनी फोडून काढल्याने विक्रांत चव्हाणांना झोप लागली नाही, तर सुधाकर चव्हाण हे रात्रभर सतत छातीत दुखत असल्याची तक्रार करीत होते. कोठडीत अन्य आरोपींसोबतचा वरणभात त्यांच्या घशाखाली उतरला नाही. त्यामुळे घरचे जेवण मिळण्याकरिता आता न्यायालयात अर्ज करण्याच्या घायकुतीला हे लोकप्रतिनिधी आले आहेत. परमार आत्महत्याप्रकरणी पोलीस कोठडीत दाखल झालेल्या विक्रांत चव्हाण यांना वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवलेले आहे. रात्रभर डास चावत असल्याची तक्रार चव्हाण सतत पोलिसांकडे करीत होते. सुधाकर चव्हाण यांचा मुक्काम कापूरबावडी कोठडीत आहे. त्यांनाही झोप लागली नाही. चौघांमध्ये सर्वात तरुण असलेल्या नजीब मुल्ला यांनी कुठलीही तक्रार केली नाही. मात्र, तेही कोठडीतील पाहुणचाराने बेजार झालेले आहेत. वस्तुत: चव्हाण आणि जगदाळेंची शनिवारी दिवसभर वैद्यकीय तपासणी झाली होती व त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचा निर्वाळा जे. जे. रुग्णालयाने दिल्यानंतर त्यांना कोठडीत धाडण्यात आले होते. सध्या तरी हे चौघे तपासाला सहकार्य करीत असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. जगदाळे आणि सुधाकर चव्हाण हे मधुमेहाचे आणि रक्तदाबाचे रुग्ण आहेत. त्यामुळे त्यांना गोड आणि तेलकट जेवण चालत नसल्याचे आरोपींचे वकील अॅड. गजानन चव्हाण यांनी पोलिसांच्या निदर्शनास आणले. त्यावर अन्य आरोपींप्रमाणेच त्यांनाही जेवणाचा भत्ता (सरकारी जेवण) दिला जाईल. न्यायालयाच्या आदेशाखेरीज कुठलीही विशेष सोईसुविधा देता येणार नाही, असे या अधिकाऱ्याने सांगितले.
कोठडीच्या पहिल्याच रात्री नगरसेवक हैराण
By admin | Updated: December 8, 2015 01:30 IST