मुंबई : प्रतिष्ठेच्या लढाईत विजयी होऊनही सत्तेच्या मोहावर पाणी सोडणाऱ्या भाजपाने, आता शिवसेनेला धोबीपछाड देण्यास सुरुवात केली आहे. महापालिका शाळांमध्ये सागवान लाकडाच्या टेबल, खुर्च्या खरेदीचा प्रस्ताव पारदर्शकतेच्या पहारेकऱ्यांनी रोखला. विशेष म्हणजे, भाजपाने विरोधी पक्षांचे समर्थन मिळवत, हा विषय हाणून पाडला. यामुळे सत्तेच्या खुर्चीवर असलेल्या शिवसेनेची नाचक्की झाली. मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांसाठी सागवान लाकडाच्या २,४३८ टेबल-खुर्च्या खरेदी करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर प्रशासनाने आज आणला. मात्र, बदलत्या काळानुसार अॅल्युमिनियम किंवा स्टीलच्या खुर्च्या का नाही? असा मुद्दा उपस्थित करत, सागवान लाकडाच्या खुर्च्यांना भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी विरोध केला. यावर आक्षेप घेत, सागवान लाकूड टिकाऊ असते, त्याची दुरुस्तीही शक्य असल्याने हा प्रस्ताव मंजूर करावा, अशी भूमिका शिवसेनेच्या नगरसेवकांनी मांडली. यामुळे उभय पक्षांमध्ये वादावादी सुरू झाली. शिवसेनेने सागवान लाकडाचे महत्त्व पटवून भाजपाच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसेनेची नाकाबंदी करण्याचा चंग बांधलेल्या भाजपाने माघार घेण्यास नकार दिला. यात त्यांना विरोधी पक्षांचीही साथ मिळाली. त्यामुळे सत्ताधारी शिवसेना स्थायी समितीमध्ये एकाकी पडल्याचे चित्र होते. स्टील किंवा अॅल्युमिनिअमचे फर्निचर की सागवानी लाकडाचे, यावरून शिवसेना-भाजपामध्ये जोरदार खडाजंगी झाली. तयारीनिशी मैदानात उतरलेल्या भाजपाने सर्वच मुद्दे उपस्थित करीत शिवसेनेची कोंडी सुरू ठेवली. (प्रतिनिधी)>शिक्षकांना टेबल-खुर्च्यांची प्रतीक्षा महापालिका नियमांनुसार स्थायी समितीमध्ये एकदा दप्तरी दाखल झालेला प्रस्ताव पुन्हा स्थायी समितीमध्ये आणण्यासाठी ९० दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे शाळा सुरू होण्यास ६० दिवस उरले असताना, दोन कोटी २४ लाख किमतीचा टेबल- खुर्चीचा प्रस्ताव रखडणार आहे. असे घेरले पहारेकऱ्यांना : हे लाकूड सागवानच असेल का? त्याचा मार्केट सर्व्हे केला आहे का, शिवाय जूनमध्ये शाळा सुरू होणार असताना, प्रस्ताव उशिरा का आणला, अशा प्रश्नांचा भडिमार करून प्रस्तावावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. सागवानी लाकूड का नको किंवा का हवे, याबाबत महत्त्व पटवून देत, दोन्ही पक्षांनी आपापल्या भूमिकेवर जोर दिला. या वेळी विरोधकांनीही भाजपाच्या भूमिकेचे समर्थन केले. त्यामुळे शिवसेना एकाकी पडली. मातोश्रीने झापले : महापालिका निवडणुकीत मोठे यश मिळाल्यानंतरही सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजपाने, शिवसेनेला रोखण्याचा आपला इरादा आधीच जाहीर केला आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या पहिल्याच काही बैठकांमध्ये भाजपा वरचढ झाल्याने, शिवसेनेचे शिलेदार अडचणीत आले आहे. कमी किमतीचा हा प्रस्ताव छोटा असला, तरी शिवसेनेची हार मोठी आहे. याची गंभीर दखल घेऊन मातोश्रीवरून फोन खणखणला आणि शिवसेनेच्या शिलेदारांची पाचावर धारणा बसली, परंतु मातोश्रीने चांगलीच खबर घेत शिलेदारांना झापले.>प्रस्ताव फेटाळला सागवानी लाकडाच्या खुर्च्या व टेबल घेण्याचा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याची उपसूचना भाजपाचे प्रभाकर शिंदे यांनी मांडली. त्यामुळे शिवसेनेला हा प्रस्ताव मतास टाकावा लागला. या मतदानात काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी या विरोधी पक्षांनी भाजपाच्या उपसूचनेला समर्थन दिले. मतदानात १४ मते या प्रस्तावाच्या विरोधात गेल्याने, हा विषय नामंजूर झाला. त्यामुळे हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याची वेळ सत्ताधारी शिवसेनेवर आली.
पहिला वाद टेबल, खुर्च्यांवरूनच !
By admin | Updated: April 6, 2017 01:57 IST