सिंदखेडराजा/ किनगाव राजा (जि. बुलडाणा): तालुक्यातील दुसरबीड शेत शिवारात दोन गटांमध्ये शेतीचा ताबा घेण्यावरुन वाद निर्माण झाला. या वादाचे पर्यावसान गोळीबारात झाले. गोळीबारात दोन जण जखमी झाल्याची घटना २९ जून रोजी दुपारी घडली. याप्रक़रणी पोलीसांनी आरोपींना अटक केली आहे. जउळका येथील रामचंद्र विठोबा सांगळे व सुरेश विठोबा सांगळे यांच्या शेताजवळ सुरेश शंकर सांगळे व प्रकाश शंकर सांगळे यांची वडिलोपाजिर्त शेती आहे. दोन्ही कुटुंबात गत तीस वर्षांपासून शेतीचा वाद होता. सध्या शेतावर रामचंद्र सांगळे यांचा ताबा आहे. न्यायप्रविष्ट असलेल्या या प्रकरणाचा निकाल नुकताच सुरेश शंकर सांगळे यांच्या बाजूने लागला होता. न्यायालयाच्या निकालानंतर सुरेश सांगळे बुधवारी शेतात ताबा घेण्यासाठी गेले असता तेथे ताबा घेण्यावरुन वाद झाला. यावेळी प्रकाश सांगळे व त्यांच्या सहकार्यांनी गोळीबार केला. यामध्ये फिर्यादी सुरेश विठोबा सांगळे (वय ४२) व रामचंद्र विठोबा सांगळे दोघे जखमी झाले. त्यांच्या पायाला गोळ्या लागल्या असून त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले आहे. याप्रकरणी आरोपी प्रकाश शंकर सांगळे, सुरेश शंकर सांगळे व दिनकर ताऊबा सांगळे रा. जऊळका यांच्याविरुद्ध किनगावराजा पोलिसांनी अप.नं. ९४/१६ भादंवि कलम ३0७, ५0४, १0९, ३४ सहकलम ३/२५ आर्म अँक्ट नुसार गुन्हा नोंदविला आहे. दरम्यान किनगावराजा पोलिसांनी आरोपीस अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
शेतीच्या वादावरुन गोळीबार
By admin | Updated: June 30, 2016 00:46 IST