मुंबई : ताडदेव आरटीओ कार्यालयातील गोदामाला आग लागल्याची घटना शनिवारी घडली आणि यात गोदाम जळून खाक झाले. या घटनेचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. ही आग गर्दुल्ल्यांमुळे लागली असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. ताडदेव आरटीओ कार्यालयात शनिवारी दुपारी ३च्या सुमारास गोदामाला आग लागली. या आगीचा अहवाल अग्निशमन दलाकडून सादर केला जाणार असून, वाहतूक पोलीसही त्याचा तपास करीत आहेत. ताडदेव आरटीओ कार्यालयात रात्रीच्या वेळेस सुरक्षा व्यवस्था नसून त्यामुळे अनेकांचा वावर असल्याचे सांगण्यात आले. आग लागली तेथे गर्दुल्ल्यांकडून वापरले जाणारे चांदीचे पेपर मोठ्या प्रमाणात आढळले. या गोदामाला विद्युत पुरवठाच नसून त्यामुळे शॉकसर्किटमुळे आग लागल्याची शक्यताच नसल्याचे सांगण्यात आले. ताडदेव आरटीओचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुभाष पेडामकर यांना विचारले असता, त्यांनी पोलीस तपास करीत असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
गर्दुल्ल्यांमुळे लागली आग ?
By admin | Updated: February 2, 2015 04:54 IST