ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 27 - राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) इंडस मॅजिक लॅब नावाच्या इमारतीला सोमवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये इमारतीचे जवळपास ८० टक्के नुकसान झाले असून लॅबमधील सर्व साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही मनुष्यहानी झाली नसून कोणीही जखमी झालेले नाही. दलाच्या पाच बंबांसह दोन टँकरच्या सहाय्याने ही आग विझवण्यात आल्याची माहिती अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी दिली. दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, एनसीएल ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील रासायनिक प्रयोगशाळा आहे. प्रयोगशाळेच्या आवारामध्ये छोट्या मोठ्या लॅबोरेटरी आहेत. इंडस मॅजिक लॅब नावाची इमारत आहे. या इमारतीला आग लागल्याची माहिती दलाला रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांनी मिळाली होती. तातडीने एक बंब घटनास्थळी रवाना करण्यात आला. परंतु, इमारतीला चारही बाजुंनी आगीने वेढा दिलेला असल्यामुळे आणखी कुमक मागवण्यात आली. दलाचे पाच बंब आणि पाण्याचे दोन टँकर घटनास्थळी रवाना करण्यात आले. अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे, सुनिल गिलबिले यांच्यासह दहा अधिकारी आणि जवळपास ३५ जवानांनी चारही बाजुंनी इमारतीवर पाण्याचा मारा सुरु केला. पाण्याचा मारा करुन अवघ्या अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. त्यानंतर थंडाव्याचे काम सुरु करण्यात आले होते. या आगीमध्ये इमारतीचा ८० टक्के भाग जळून खाक झाला आहे. जेव्हा आग लागली तेव्हा इमारतीमध्ये कोणीही नव्हते. काम संपवून सर्वजण बाहेर पडले होते. या लॅबमध्ये विविध रसायने, केमिकल्स, एलपीजी सिलींडर्स होते. परंतु, सुदैवाने कशाचाही स्फोट झाला नाही. इमारतीजवळ परिसरातील कर्मचारी आणि अधिका-यांनी धाव घेत जवानांना मदत केली. ही आग एवढी तीब्र होती की इमारतीमधील लोखंडाचे खांबही वाकले आहेत. या इमारतीशेजारीच अनेक छोट्या मोठ्या लॅब आहेत. शेजारी असलेली बैठी इमारतीतील लॅब वाचवणे जवानांपुढील आव्हान होते. जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणून पुढील अनर्थ टाळला. एनसीएलमध्ये यापुर्वीही अशा प्रकारे आगीच्या दोन - तीन घटना घडलेल्या आहेत. --------------------------ज्या इमारतीला आग लागली होती त्याशेजारी एक बैठी इमारत आहे. या इमारतीमध्ये हायड्रोजन सिलेंडर्स आणि स्फोट होऊ शकतील असे ज्वालाग्रही केमिकल्स होती. दलाच्या जवानांनी जिवाची पर्वा न करता हे सर्व साहित्य विद्युत वेगाने बाहेर काढले. हे सर्व साहित्य सुरक्षित स्थळी हलवल्याने त्याला धग लागू शकली नाही. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. जर या साहित्याला धग लागली असती तर आगीने आणखी रौद्ररुप धारण केले असते. अग्निशामक दलाच्या अधिकारी व जवानांनी प्रयत्नांची शर्थ करीत मोठा अनथ टाळला.
एनसीएलच्या इंडस मॅजिक लॅबमध्ये आग
By admin | Published: March 27, 2017 10:33 PM