ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 17 - घोटी शहरातील रामरावनगर भागातील दुर्गा नगर येथील स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी शिकवणीसाठी गेलेल्या शाळकरी मुलाचे अपहरण झाले असल्याच्या प्रकारानंतर घोटी शहरात खळबळ उडालेली असताना हा अपहृत मुलगा आज दुपारी स्वतः हून घरी परतला आहे. याबाबत सदर मुलाच्या पालकाने आपल्या मुलाची अज्ञात व्यक्तीने फूस लावून अपहरण केल्याची फिर्याद घोटी पोलीस ठाण्यात दिली होती.सदर उमेश भारमल हा दहावी इयत्तेत शिकत असल्याने त्याला अभ्यास करण्यासाठी आई-वडिलांचा सातत्याने दबाव येत असल्याने व्यथित झालेल्या या मुलाने स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. यानुसार तो घोटी ते इगतपुरी असा रिक्षाने प्रवास करून पुढे रेल्वेने मुंबईच्या दादर रेल्वे स्टेशनवर पोहोचला. तिथे रात्रभर रेल्वे स्थानकावर झोपून तो लोकलने कसाऱ्यापर्यंत आला व पुढे पॅसेंजर गाडीने घोटीत आला.दरम्यान आपले कोणीही अपहरण केले नसून आपल्यावर अभ्यासासाठी होणाऱ्या दबावापोटी पलायन केले असल्याचा निर्वाळा या शाळकरी मुलगा उमेश भारमल याने पोलीस चौकशीत दिला असल्याने अपहरण नाट्यवर अखेर पडदा पडला आहे.