नागपूर : येथील एका इस्पितळातील डॉक्टरांच्या तुकडीने 6क् वर्षे वयाच्या एका महिलेवर अगदी विरळा म्हणता येईल अशी शस्त्रक्रिया करून गेली 36 वर्षे तिच्या ओटीपोटात राहिलेला न जन्मलेल्या अर्भकाचा सांगाडा बाहेर काढला!
ही अद्भुत शस्त्रक्रिया झालेल्या महिलेचे नाव कांताबाई गुणवंत ठाकरे असे असून, ती मध्य प्रदेशातील पिपरिया (शिवणी) या गावातील आहे. बाह्यरुग्ण म्हणून उपचारासाठी आलेल्या कांताबाईवर येथील एनकेपी साळवे इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि लता मंगेशकर इस्पितळातील डॉक्टरांच्या चमूने गेल्या आठवडय़ात ही शस्त्रक्रिया केली. डॉ. बी.एस. गेडाम यांनी या डॉक्टरी पथकाचे नेतृत्व केले.
इस्पितळाच्या शल्यक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. मुर्तझा अख्तर यांनी सांगितले की, कांताबाईंना वयाच्या 24व्या वर्षी सन 1978मध्ये गर्भाशयाबाहेर गर्भधारणा झाली होती. या गर्भाची पूर्ण वाढ न होता तिचे गर्भारपण अध्र्यावरच संपुष्टात आले होते. गेल्या 36 वर्षात तो गर्भ विरून जाऊन एका ठिसूळ पिशवीत अडकलेला त्याच्या हाडांचा सांगाडा फक्त शिल्लक राहिला होता.
शस्त्रक्रिया केली असता गर्भाच्या हाडांचा हा सांगाडा कांताबाईंचे गर्भाशय, आतडी व मूत्रपिंड यांच्या मधल्या जागेत अडकून या तिन्ही अवयवांना चिकटून बसला असल्याचे आढळून आले. यामुळेच गेले काही महिने या महिलेस ओटीपोटात वेदना होऊन लघवीच्या वेळी त्रस होत होता. कांताबाईंचा एक बिजांडकोषही जागेवर नसल्याचे डॉक्टरांना आढळले.
गेले दोन महिने ओटीपोटात सतत वेदना होत असल्याची तक्रार घेऊन कांताबाई या इस्पितळात बाह्यरुग्ण म्हणून आल्या होत्या. तपासणी केली असता तिच्या ओटीपोटाच्या खालील बाजूस आतमध्ये कसला तरी गोळा असल्याचे जाणवले व कदाचित ती कर्करोगाची गाठ असावी, अशी डॉक्टरांना सुरुवातीस भीती होती. सोनोग्राफी केली असताही ओटीपोटातील अज्ञात गोळ्याचे अस्तित्व नक्की झाले. सीटी स्कॅन केला असता हा गोळा कसल्यातरी कठीण पण ठिसूळ पदार्थाचा असल्याचे स्पष्ट झाले.
गेल्या 14 ऑगस्टला सुमारे चार तासांच्या शस्त्रक्रियेनंतर कांताबाईंच्या ओटीपोटातून हाडाच्या सांगाडय़ाचे हे गाठोडे बाहेर काढले गेले व आता त्यांची प्रकृती झपाटय़ाने सुधारत असल्याचे डॉ. गेडाम यांनी सांगितले. (पी.टी.आय.)
च्या महिलेला गर्भाशयाबाहेर गर्भधारणा झाली होती. वैद्यकीय परिभाषेत यास ‘एक्टॉपिक प्रेगन्सी’ असे म्हटले जाते. अशा गर्भाची प्रसंगी पूर्ण वाढ झाली तरी तो नैसर्गिक प्रसूतीमार्गाने जन्माला येऊ शकत नसल्याने महिलेल्या शरीरात तसाच राहतो.
च्अशा प्रकारे न जन्माला आलेल्या गर्भाचे अवशेष महिलेच्या शरीरात 36 वर्षे इतका दीर्घकाळ टिकून राहण्याची वैद्यकशास्त्रत नोंद होणारी ही पहिलीच केस ठरणार आहे. आत्तार्पयतच्या वैद्यकीय रेकॉर्डनुसार बेल्जियममधील एका महिलेच्या शरीरात तिच्या न जन्मलेल्या अर्भकाचे अवशेष 18 वर्षे टिकून राहिल्याची नोंद आहे.