आळंदी : ‘ज्ञानेश्वर माउली, ज्ञानराज माउली तुकाराम...’ असा संजीवन सोहळ्याच्या कीर्तनातील जयघोष... आणि घंटानाद... समाधीवर पुष्पवृष्टी... संत नामदेव महाराज व माउलींची भेट... आणि असंख्य भाविकांचे पाणावलेले डोळे... अशा भावपूर्ण वातावरणात श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा ७१८वा संजीवन समाधी सोहळा गुरुवारी दुपारी ‘माउली-माउली’च्या जयघोषात पार पडला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांनी हा सोहळा डोळ्यांत साठवत ‘श्रीं’चे दर्शन घेतले.तत्पूर्वी, माउलींना पवमान अभिषेक व दूधआरती घालून पहाटे ३च्या सुमारास प्रमुख विश्वस्त डॉ. प्रशांत सुरू यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. त्यानंतर सकाळी ११पर्यंत भाविकांच्या महापूजा, दर्शन व नामदेवराय यांच्या वतीने श्रींची महापूजा घेण्यात आली. सकाळी वीणा मंडपात देवस्थानच्या वतीने कीर्तन झाल्यानंतर मुख्य संजीवन सोहळ्याला सुरुवात झाली. १० वाजता संत नामदेव महाराजांचे वंशज हभप ज्ञानेश्वर महाराज नामदास यांचे कीर्तन झाले. मंदिराच्या महाद्वारात काल्याचे कीर्तन व हैबतबाबा दिंडीचे आगमन झाले.दुपारी १२च्या सुमारास संजीवन समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. घंटानाद, अभिषेक आणि माउलींच्या समाधीवर पुष्पवृष्टी करून आरती करण्यात आली. संत नामदेव महाराजांच्या पादुका त्यांच्या वंशजांमार्फत वीणा मंडपातून करंज्या मंडप, पंखा मंडप व मुख्य गाभाऱ्यात माउलींच्या समाधीच्या पुढे विराजमान करण्यात आल्या. अलंकापुरीत प्रत्येक भाविकाने पवित्र इंद्रायणी नदीत स्नान करून त्रयोदशी साजरी केली तर काही भाविक महाप्रसाद वाटत होते. सोहळ्यानंतर भाविक घरी परतू लागतात. परंतु, श्री ज्ञानदेवांचा मुख्य वार गुरुवार असल्याने या पवित्र दिवशी अनेक भाविक आळंदीतून घरी परतले नव्हते. त्यांनी अलंकापुरीतच मुक्काम केला.
पाहुनी समाधीचा सोहळा। दाटला इंद्रायणीचा गळा।।
By admin | Updated: November 21, 2014 02:18 IST