पिंजर (जि. अकोला): विश्वासात न घेता शेत विकल्याचा राग अनावर झालेल्या मुलाने कुर्हाडीचे घाव घालून वडिलांची निर्घृण हत्या केल्याची घटना, पिंजर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कानडी बाजार येथे मंगळवारी रात्री घडली. पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, कानडी बाजार येथील गोपाल भगवान गजभिये (४८) यांच्याकडे तीन एकर ओलिताची, तर तीन एकर कोरडवाहू शेत आहे. त्यापैकी तीन एकर ओलिताचे शेत, गोपाल गजभिये यांनी कारंजा येथील एका गृहस्थाला विकले. गोपाल गजभिये यांनी शेत विकल्याची माहिती, त्यांचा धाकटा मुलगा आकाश गजभिये (१९) याला समजल्यानंतर त्याने ११ नोव्हेंबरच्या रात्री त्याबाबत वडिलांना जाब विचारला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. रात्री १२ च्या सुमारास वाद विकोपास गेल्यानंतर, गोपाल गजभिये यांनी आकाशच्या अंगावर दगड भिरकावला. त्यामुळे संतप्त झालेल्या आकाशने जन्मदात्या बापाच्या डोक्यावर व हातावर कुर्हाडीने सपासप वार केले. प्राणघातक वारांमुळे गोपाल गजभिये जागीच ठार झाले. बुधवारी सकाळी ही माहिती मिळताच, पिंजर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व आरोपी आकाशला ताब्यात घेऊन, त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. आकाश मूर्तिजापूर तालुक्यातील हेंडज येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाला आहे.
शेतीच्या वादातून मुलाने केली वडिलांची हत्या!
By admin | Updated: November 12, 2014 23:46 IST