पिकांची नासाडी : इस्पात कंपनीतील धुरांचा त्रास,आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेतलेवरोरा : तालुक्यातील मजरा गावाच्या शिवारात असलेल्या बी.एस. इस्पात कंपनीतील धुरामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. कंपनीने आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, या मागणीकरिता शेतकऱ्यांनी बुधवारी कंपनीकडे जाणारा रस्ता पाच तास रोखून धरला. अखेर कंपनीने प्रति शेतकरी १० हजार रुपये अनुदान तात्पुरत्या स्वरूपात देण्याचे आश्वासन प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर दिल्याने शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतले. वरोरा तालुक्यातील मजरा (खु) गावाच्या शेतशिवारात बी.एस. इस्पात कंपनीचा स्पंज आयर्न निर्मितीचा उद्योग आहे. या उद्योगामधून निघणाऱ्या धुरामुळे परिसरातील १५ पेक्षा अधिक शेतकऱ्यांची जवळपास १०० हेक्टर जमिनीवरील पिके मागील कित्येक वर्षांपासून धोक्यात येत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे. कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, याकरिता शेतकऱ्यांनी अनेकदा कंपनीकडे निवेदने दिली, आंदोलने उभारली. प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठकीही घेतल्या. परंतु आजतागायत शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला मिळाला नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळी ६ वाजता मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वरोरा शहर अध्यक्ष मनीष जेठाणी यांच्या नेतृत्वात कंपनीच्या रस्त्यावर बैलबंडी ठेवून रस्ता अडविला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहने उभी झाली. कंपनीत जाणाऱ्या अधिकारी व कामगारांनाही त्याचा फटका बसला. आंदोलन सुरू होऊन जवळपास सहा तासांनंतर कंपनीचे अधिकारी परमार, बोकील यांनी आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा केली. चर्चेनंतर प्रतिशेतकरी १० हजार रुपये तात्पुरती मदत व पिकाच्या नुकसानीची कृषी विभागाकडून पाहणी करून अहवालानुसार नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांनी रोखला पाच तास रस्ता
By admin | Updated: February 5, 2015 01:05 IST