ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - नोटाबंदी निर्णयावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शिरसंधान साधत सामना संपादकीयमधून टीका केली आहे. नोटाबंदीचे पितळ असेही उघड पडलेच आहे. त्यात तीन महिन्यांतच ‘मेड इन पाकिस्तान’ नोटांचा सुळसुळाट देशात पुन्हा व्हायला सुरुवात झाली आहे. नोटाबंदी हा पोकळ वासा आहे आणि त्यातून काही साध्य होणार नाही. झाला तर फक्त अर्थव्यवस्था व सामान्य जनतेलाच त्रास होईल हे आमचे आणि इतरही तज्ञांचे सुरुवातीपासूनचे म्हणणे होते. ‘मेड इन पाकिस्तान’ नोटांनी तेच सिद्ध केले असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
नोटाबंदीमुळे पाकिस्तान आणि बांगलादेशातील बनावटनोटांचे कारखाने उद्ध्वस्त झाले, दहशतवादी आणि नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार छातीठोकपणे सांगत असते. किंबहुना आपले पंतप्रधान नोटाबंदीचे प्रवचन झोडतात तेव्हा नोटाबंदी करण्यामागे हे एक महत्त्वाचे कारण कसे होते, हे सांगायला विसरत नाहीत. मात्र आता ही सगळी हवेतलीच तलवारबाजी होती हे स्पष्ट झाले आहे असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.
नोटाबंदी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी देशावर लादली गेली. म्हणजे या निर्णयाला तीनच महिने झाले आहेत. मात्र तरीही दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा पाकिस्तानातून हिंदुस्थानात दाखल झाल्या आहेत. या ‘गुलाबी’ नोटांनी केंद्र सरकारच्या दाव्याची पोलखोलच केली आहे. नोटाबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बनावट चलनाची ‘वाळवी’ लागणार नाही, असा दावा नोटाबंदीच्या वेळी मोदी आणि त्यांचे सरकार करीत होते. मग आता तीन महिन्यांतच दोन हजार रुपयांच्या ‘पाकिस्तान मेड’ बनावट नोटा हिंदुस्थानात कशा दाखल झाल्या? नव्या नोटांच्या १७ पैकी ११ ‘सिक्युरिटी फिचर्स’ची हुबेहूब नक्कल करणे पाकिस्तानी ‘आयएसआय’ला कसे शक्य झाले? असे सवाल उद्धव ठाकरेंनी विचारले आहेत.
चोर हा नेहमीच कायद्याच्या पुढे धावायचा प्रयत्न करतो हे खरेच, पण बनावट नोटांचे दरोडेखोर आमच्या ‘हिंमतबाज’ सरकारपेक्षाही हुशार निघाले. बनावट नोटांच्या समांतर अर्थव्यवस्थेला नोटाबंदीचे अस्त्र भेदू शकलेले नाही या अपयशाचा स्वीकार मोदी आता करणार आहेत का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. नोटाबंदी म्हणजे काळय़ा पैशावर, दहशतवादी आणि नक्षलवाद्यांवर, बनावट नोटांवर, त्या पाठविणाऱया शत्रूंवर ‘सर्जिकल स्ट्राइक’ होता ही बढाई बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी निघाली. मग कशासाठी १२५ कोटी जनतेला तासन् तास त्यांच्याच पैशांसाठी बँकांबाहेर रांगेत उभे राहायला लावले? १०० च्या वर जणांना मरणाच्या दारात ढकलले? असे संतप्त सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केले आहेत.
शेवटी नोटाबंदी हे ‘बुडबुडे’ होते आणि ते फुटणारही होतेच. अवघ्या तीनच महिन्यांत ते फुटले. आमचा अंदाज खरा ठरला म्हणून आम्हाला आनंद झालेला नाही. उलट आम्हाला दुःख आहे ते नोटाबंदीच्या नसत्या उपद्व्यापाने देशाची अर्थव्यवस्था विनाकारण पणाला लावली गेली त्याचे. १२५ कोटी जनतेला जो प्रचंड मनस्ताप झाला आणि बनावट नोटांचा गोरख धंदाही बंद झाला नाही याचे. अर्थात, ज्यांनी नोटाबंदीचे बुडबुडे हवेत सोडले त्यांना आता तरी पश्चात्ताप होणार आहे का? आणि त्यासाठी ते प्रायश्चित्त घेणार आहेत का? सामान्य जनतेला या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.