ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे टुरीस्ट मुख्यमंत्री असून त्यांनी महाराष्ट्रातल्या दुष्काळी परस्थितीला प्राधान्य देऊन विशेष अधिवेशन बोलवायला हवे होते, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केली आहे. एका वत्तवाहिनीशी बोलताना, विदेश दौरे केले की उद्योग येतात ही चुकीची समजूत असून उद्योगधंदे राज्यात येतात आणि सरकारशी चर्चा करून गुंतवणूक करतात. त्यासाठी विदेशात फिरायची गरज नाही असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या जलशिवार योजनेची खिल्ली उडवताना ही तर जुनीच योजना नवीन नावाने आणलेली असल्याचा आरोप राणे यांनी केला आहे. मुळात पाऊसच नाही, पाणीच नाही तर पाणी साठवणार कसं असा प्रश्न विचारतानाच राणे यांनी पंतप्रधानांनी मालदीवला विमानानं पाणी पाठवलं होतं याची आठवण करून देत, महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीचा खंबीर मुकाबला करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
आपण कोकणातल्या जनतेची सोय केली. रस्ते, शिक्षण, आरोग्याच्या सोयी, पायाभूत सुविधा, वीज, पाणी सगळं दिलं परंतु तरीही आपल्याला जनतेनं का पाडलं तेच कळत नाही हे सांगताना नारायण राणे यांनी जनतेनं दुर्गंधीचं भविष्य निवडलं असल्याचं राणे म्हणाले.
राणेंच्या मुलाखतीमधले मुख्य मुद्दे:
- मुंडेंसारखा नेता भाजपमध्ये नाही, गडकरीही महाराष्ट्रात नसल्याने भाजपमध्ये उणिवा.
- दुष्काळाचा प्रश्न नामांतरापेक्षा जास्त महत्त्वाचा असताना शिवसेनेचा नामांतरासाठी अट्टाहास.
- शिवसेनेचा एकही नेता मंत्री म्हणून प्रभाव पाडू शकला नाही.
- काँग्रेसमध्ये पुन्हा सत्तेवर आणण्याची क्षमता आहे, आणि आम्ही लोकांपुढे जाऊन पुन्हा संधी देण्याची विनंती करणार.
- मुख्यमंत्र्यांनी परदेशी दौऱ्यावर जाण्याऐवजी दुष्काळ निवारणाला प्राधान्य द्यावं.
- मी मुख्यमंत्री असताना धडाडीने निर्णय घेत होतो. तीन मिनिटांत 17 आणि 100 दिवसांत दीडशे निर्णय घेतल्याचा दाखला.
- अधिवेशन बोलवा, सगळ्या पक्षांनी राजकारण बाजुला ठेवून दुष्काळावर मार्ग काढू. राणेंचं मुख्यमंत्र्यांना आवाहन.
- मुख्यमंत्री हे टुरीस्ट मुख्यमंत्री असल्याचे सांगत राणेंची फडणवीसांच्या जपान दौ-यावर टीका.