रोहित नाईक - मित्रांनो तुम्हाला एफ - वन रेसिंग आवडते ना? जगभरात अत्यंत फेमस असलेल्या या खेळामध्ये जर्मनीचा मायकल शूमाकर बेताज बादशहा आहे. त्याने सर्वाधिक ७ वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली आहे. रेसिंगमधील जवळपास सर्वच रेकॉडर््स त्याच्या नावावर आहेत. मायकलला लहानपणापासूनच गाड्यांचे आकर्षण होते. तो चार वर्षांचा असतानाच त्याच्या वडिलांनी (रॉल्फ शूमाकर) छोटे मोटरसायक इंजीन असलेली एक छोटी पॅडेल कार त्याला गिफ्ट केली होती. दिवसभर ती कार पळवताना एक दिवस मायकलने रस्त्यावरील दिव्याच्या खांबाला धडक मारली. वेगाने गाडी चालवण्याची त्याची हौस पाहून वडिलांनी त्याला कार्टींग ट्रॅकवर नेले. त्या वेळी तो त्या क्लबचा सर्वात लहान सदस्य बनला. यानंतर मायकल सहा वर्षांचा झाल्यावर वडिलांनी त्याच्यासाठी छोटी रेस कार बनवली आणि त्याच कारने मायकलने पहिली क्लब चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली. मायकलच्या गुणांना पाहून त्याच्या वडिलांनी रेसिंग कार दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतले. तर त्याच्या आईने रेसिंग ट्रॅकच्या कँटीनमध्ये नोकरी केली. त्या वेळी मायकलला आधुनिक ८०० डीएम शक्तीच्या इंजीनच्या कारची आवश्यकता होती आणि त्याच्या मम्मी-पप्पांकडे तेवढी रक्कम नसल्याने त्यांनी हा पार्ट-टाइम जॉब केला आणि त्याला ती कार मिळवून दिली. सांगायचा अर्थ काय, तर मम्मी-पप्पांनी केलेल्या कष्टामुळेच छोटा मायकल एफ-वनचा बादशहा बनला.