रत्नागिरी : अपघातात स्वत:च्या आठ वर्षांच्या मुलाला गमावल्याने दु:खाचा डोंगर शिरावर असताना एका कुटुंबाने समोर आलेल्या सत्व परीक्षेला सामोरे जात स्वत:च्या मुलाचे नेत्रदान केले. स्वत:चा मुलगा अपघाती गमावला, तरी दुसऱ्या अंध मुलाला दृष्टी देण्याचे महान कार्य एवढ्या दु:खाच्या क्षणी करणाऱ्या या कुटुंबाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.हे दुर्दैवी पण दानशूर कुटुंब आहे रत्नागिरीच्या शांतीनगर, रसाळवाडी येथील. संगमेश्वरनजीक तुरळ येथे ५ नोव्हेंबर रोजी पहाटे ६ वाजता झालेल्या एका अपघातात या कुटुंबातील सहा व्यक्ती गंभीर जखमी झाल्या. त्यापैकी एकाचा जाग्यावरच मृत्यू झाला. या अपघातात राज सुभाष रसाळ हा आठ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर नजीकच्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. मात्र, उपचाराला साथ न मिळाल्यामुळे त्याला अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, राजचे प्राण ते वाचवू शकले नाहीत.राजची प्राणज्योत मालवली आणि रसाळ कुटुंबीयांसमोर सत्वपरीक्षेचा काळच उभा राहिला. याच हॉस्पिटलमध्ये एका गरजू मुलाच्या नातेवाईकांनी राजच्या डोळ्यांची मागणी केली. अवघ्या आठ वर्षांच्या मुलाचा निपचित पडलेला देह समोर असताना, अश्रूचा बांध फुटलेला असताना त्या क्षणी स्वत:ला सावरुन राजचे वडील सुभाष रसाळ यांनी आपल्या या चिमुकल्याचे डोळे देण्यास समर्थता दाखविली. अपघात झाल्यानंतर राजच्या मृत्यूपर्यंत दु:ख करायलाही देवाने रसाळ यांना वेळ दिला नाही. उलट त्यांच्यासमोर सत्वपरीक्षेचा काळ उभा ठेवला. तरीही रसाळ यांनी आपल्या मृत मुलाबरोबरच समोर असलेल्या एका अंध मुलाचाही विचार केला आणि स्वत:च्या मुलाचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. सुभाष रसाळ यांच्या या निर्णयामुळे राज याचे डोळे त्याच्या मृत्यूनंतरही हे जग पाहात आहेत, तर दुसरीकडे जग पाहू न शकणाऱ्या एका मुलालाही दृष्टी मिळाली आहे. रसाळ कुटुंबियांच्या या दानशूरपणाचे आणि धीरोदात्तपणाचे कौतुक होत आहे. (प्रतिनिधी)महाकठीण काळ!पोटच्या गोळ्याने काही वेळापूर्वीच प्राण सोडलेला आणि दुसरीकडे एक अंध मुलांच्या दृष्टीचा प्रश्न उभा ठाकलेला, याही कठीण प्रसंगातून रसाळ यांनी मनावर दगड ठेवून हा निर्णय घेतला आणि दृष्टीदान केले.
रत्नागिरीतील राजच्या डोळ्यांनी मिळवून दिली अंधाला दृष्टी
By admin | Updated: November 9, 2014 23:35 IST