लातूर : राज्य शासनाने दलित अत्याचार वाढत असलेल्या जिल्ह्यांचा क्रम लावून सर्वाधिक अत्याचार होत असलेल्या जिल्ह्यात जलद तपास आणि कारवाईसाठी एक अतिरिक्त पोलीस अधीक्षक पद वाढवावे, अशी मागणी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत केली. दलितांवर सवर्णांनी बहिष्कार टाकलेल्या वडगाव (ता. निलंगा) येथे भेट देण्यासाठी ते आले होते़ त्यानंतर दलित आणि सवर्ण यांच्यातील वाद आता मिटल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले़ निलंगा तालुक्यातील वडगावमध्ये तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केल्यावरून गावातील चार-दोन लोकांनी वाद घातला आणि संपूर्ण गाव बदनाम झाले. बहुतांश ठिकाणी असेच होते. या वाढत्या अत्याचारामुळे किमान सर्वाधिक अत्याचार असलेल्या जिल्ह्यात अतिरिक्त पोलीस अधीक्षक नेमावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे त्यांनी सांगितले. लातूर येथे जवखेड दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चावेळी झालेल्या दगडफेकीत ३४ लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. आमचे कार्यकर्ते गरीब आहेत. त्यांच्याकडून वसुली करणे योग्य नाही, असे आपण जिल्हाधिकाऱ्यांना सांगितल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
अत्याचारग्रस्त जिल्ह्यात अतिरिक्त एसपी नेमा
By admin | Updated: November 22, 2014 03:06 IST