अमरावती : मंगरुळ चव्हाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पापळ शिवारातून जिलेटिन आणि डिटोनेटर या स्फोटकांचा साठा गुरुवारी रात्री जप्त करण्यात आला. यात २३३ सुपर पॉवर डिटोनेटर आणि १६७ जिलेटिनचा समावेश आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.पापळ ते उंदिरखेडा मार्गावरील संजय लाटे यांच्या शेतात राहणाऱ्या काही व्यक्ती अवैधरीत्या ब्लास्टिंगचे काम करीत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांच्या दहशदवादविरोधी पथकाला मिळाली. त्यावरून पोलीस पथकाने धाड घातली. लाटे यांच्या शिवारात त्या वेळी दोन ट्रॅक्टर उभे होते. शेतातील झोपडीत शिरल्यानंतर पोलिसांनी तेथे उपस्थित पाच जणांची कसून चौकशी केली. पाचही आरोपींनी अवैधरीत्या ब्लास्टिंग करीत असल्याची कबुली देत घातक स्फोटक पदार्थांचा साठाही दाखविला. आरोपींमध्ये हेमसिंग सजनसिंग राठोड (३८), ओमप्रकाश अक्तुकुमार (३८), पूनमसिंग खुमानजी कुमार (३०) मदनसिंग नारायणसिंग चव्हाण (२७) आणि माघू लाडू कुमार (४५, सर्व राहणार भिलखेडा, राजस्थान) यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
अमरावतीतून स्फोटके जप्त
By admin | Updated: January 22, 2016 03:41 IST