शीलेश शर्मा, नवी दिल्लीराज्यसभा खासदार विजय दर्डा यांनी सोमवारी राज्यसभेत जैन धर्माशी संबंधित अतिप्राचीन मूर्ती चोरीच्या वाढत्या घटनांवर तीव्र चिंता व्यक्त करीत, सरकारने यावर स्पष्टीकरण देण्याची मागणी केली.दर्डा यांनी शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित केला. देशात जैन तीर्थंकरांच्या मूर्ती चोरींच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. यामुळे समस्त जैन समुदाय चिंतित आहे. अशा घटना अन्य कुठल्या धर्माबाबत घडल्या असत्या तर काय प्रतिक्रिया उमटल्या असत्या हे सांगण्याची गरज नाही, असे दर्डा म्हणाले. दुर्मीळ मूर्ती चोरीच्या घटनांवर अंकुश लावण्यासाठी तत्काळ पावले उचलण्याची मागणी त्यांनी या वेळी केली. जुलै २०१५पासून आतापर्यंतच्या मूर्ती चोरीच्या घटनांचा संपूर्ण तपशील दर्डा यांनी सभागृहासमक्ष ठेवला. काही दिवसांपूर्वीच बिहारच्या जमुई जिल्ह्यातून २६०० वर्षे जुनी भगवान महावीरांची मूर्ती सशस्त्र लोकांनी पळवून नेली. समाधानाची बाब म्हणजे, तत्काळ कारवाई करीत, बिहार पोलिसांनी या मूर्तीचा छडा लावला, असे सांगत ते म्हणाले की, यंदा जैन मूर्ती चोरीच्या अनेक बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये ठळकपणे झळकत आहेत. २७ जुलै २०१५ रोजी कांकेर रायपूरमध्ये पाच जैन प्राचीन वस्तूंची चोरी झाली. जून २०१५मध्ये किशनगंज, बिहार येथून भगवान महावीरांची अष्टधातूची मूर्ती चोरी झाली. तत्पूर्वी फेबु्रवारीत आगऱ्यातील जैन मंदिरातून ८ लाख रुपयांचे दागिने चोरी गेले. तिरवन्नामलाई येथून भगवान महावीरांच्या ४ कांस्यमूर्ती चोरीस गेल्या. अलाहाबादेतून कोट्यवधी रुपयांच्या ३ अष्टधातूंच्या मूर्तींची चोरी झाली. याशिवाय उदयपूर आणि अजमेर मंदिरातूनही मौल्यवान मूर्ती चोरीस गेल्या. भोपाळच्या मंदिरातून छत्र व रोख रक्कम चोरीस गेली. मेरठ, उज्जैन आणि इंदूर येथूनही जैन धर्माच्या बहुमूल्य मूर्ती चोरीस गेल्या.या चोरीच्या घटना रोखण्यासाठी सरकारने काय पावले उचलली, असा सवाल करीत दर्डा यांनी यावर सरकारने स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. शिवाय देशातील सर्वांत लहान अल्पसंख्याक समुदायाचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी विशेष पावले उचलण्याची मागणीही पुढे रेटली.सन १९९९ ते २००० काळात जैन धर्माशी संबंधित अनेक अतिप्राचीन मूर्तींचे अवशेष सापडले. त्या आगऱ्याच्या फतेहपूर सिक्री येथील ठिकाणी पुन्हा उत्खनन सुरू करण्याची मागणी राज्यसभा खासदार विजय दर्डा यांनी पुढे रेटली आहे.सोमवारी राज्यसभेत विशेष उल्लेखादरम्यान दर्डा यांनी हा मुद्दा उपस्थित केला. १९९९ ते २००० या काळात चबेली टिलानजीकच्या उत्खननादरम्यान भगवान आदिनाथ, भगवान ऋषभनाथ, भगवान महावीर यांच्यासह जैन धर्माशी संबंधित हजारो वर्षे जुन्या मूर्ती व अन्य अवशेष सापडले होते. इतका बहुमोल वारसा मिळूनही या ठिकाणचे उत्खनन थांबवण्यात आल्यावर दर्डा यांनी आश्चर्य व्यक्त केले. या ठिकाणच्या उत्खननात हजारो वर्षे प्राचीन जैन मूर्ती मिळाल्या यावरून संबंधित ठिकाणी कधीकाळी जैन धर्माशी संबंधित मंदिर असावे. एवढेच नाही, तर आठव्या व नवव्या शतकात हे क्षेत्र व्यापार व जैन धर्माचे केंद्र राहिले असावे, असा युक्तिवाद दर्डा यांनी या वेळी केला.उत्खननात सापडलेल्या जैन मूर्तींचे अवशेष फतेहपूर सिक्रीच्या अतिथीगृहात ठेवण्यात आले आहेत, याकडे लक्ष वेधत या बहुमूल्य वारशाचे योग्य जतन होत नसल्याबद्दल दर्डा यांनी चिंता व्यक्त केली. मूर्ती सापडल्या त्या ठिकाणी उत्खनन पुन्हा सुरूकरावे, तसेच उत्खननात आतापर्यंत सापडलेल्या मूर्ती व अन्य वस्तूंना एखाद्या संग्रहालयात तपशीलवार माहितीसह सुरक्षित जतन करून ठेवावे, अशी मागणी त्यांनी केला. पुरातत्त्व विभागाला मूर्ती व जैन धर्माशी संबंधित अन्य वस्तू सापडल्या त्या तलावाचाही त्यांनी उल्लेख केला.
जैन तीर्थंकरांच्या मूर्ती चोरीच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण द्या!
By admin | Updated: December 8, 2015 01:32 IST