अर्जुन कर्पे - कवठेमहांकाळ-तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे, मात्र महायुतीतील भाजप-सेनेचा वाद न मिटल्याने, तिकीट कोणाला मिळणार याबाबत संभ्रमावस्था आहे. माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून, उमेदवारी आपल्यालाच आहे, असे सांगत प्रचार सुरू केला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, गृहमंत्री आर. आर. (आबा) पाटील यांची उमेदवारी निश्चित असल्याने आघाडीचे कार्यकर्तेही प्रचाराचे रान उठवत आहेत. ही निवडणूक मतदारसंघात दूरगामी राजकीय परिणाम करणारी ठरणार असून, घोरपडे अस्तित्व टिकविण्यासाठी लढतील, तर गृहमंत्री पाटील प्रतिष्ठा टिकविण्यासाठी सर्वस्व पणाला लावतील.कवठेमहांकाळ तालुक्यात नवी राजकीय समीकरणे तयार होत असून, घोरपडे यांना भाजपच्या माध्यमातून उतरवून निवडून आणायचे, असा चंग खासदार संजयकाका पाटील यांनी बांधला आहे, तर गृहमंत्री पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि विजय सगरे यांनी ताकत उभी केली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी या मतदारसंघात मोदी लाटेमुळे भाजपला फायदा झाला. मतदारसंघातील राष्ट्रवादी आणि काँग्रेसअंतर्गत वादाचाही मोठा फटका काँग्रेसच्या उमेदवाराला बसला. दुहीचा अनुभव घेतल्याने गृहमंत्री पाटील यांनी या महिन्यात मतदारसंघात आघाडीतील बिघाडी नष्ट करण्याचा प्रयत्न चालवला आहे. राष्ट्रवादीतील गटबाजीला तिलांजली द्यायला लावून कार्यकर्त्यांना गट-तट विसरून कामाला लावले आहे. महिलांच्या संघटनासाठी माजी सभापती सुरेखा कोळेकर, सभापती वैशाली पाटील, कल्पना घागरे, उषाताई माने, माजी महिला बालकल्याण सभापती राधाताई हाक्के, बबुताई वाघमारे यांना तालुक्यात व्यूहरचना करण्यास सांगितले आहे. महायुती तुटल्याने शिवसेनेचे जयसिंगराव शेंडगे हेही रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ही निवडणूक घोरपडे यांच्या अस्तित्वाची, तर गृहमंत्री पाटील यांच्या प्रतिष्ठेची मानली जात आहे.आधीच दिला शहनुकत्याच झालेल्या महांकाली साखर कारखान्याच्या निवडणुकीत विजय सगरे व गृहमंत्री पाटील गटाच्या पॅनेलने महायुतीचा धुव्वा उडवला. त्याद्वारे महायुतीचे संभाव्य उमेदवार अजितराव घोरपडे यांना निवडणुकीआधीच गहमंत्री पाटील यांनी शह दिल्याचे बोलले जाते.
अस्तित्वाचा आणि प्रतिष्ठेचाही प्रश्न
By admin | Updated: September 25, 2014 23:28 IST