यदु जोशी, मुंबईपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत केंद्र सरकारने निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करताना खासदारांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. तर नियमितपणे व्यायाम, आंघोळ आणि शिवराळपणा सोडण्याच्या अटीने गावकऱ्यांचीही दमछाक होऊ शकते. खासदारांनी दत्तक घ्यावयाच्या आदर्श गावांसाठी सरकारने मार्गदर्शक तत्त्वांची मोठी यादी खासदारांना पाठविली आहे. या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता करताना खासदारांच्या आणि गावकऱ्यांच्याही नाकीनऊ येऊ शकतात. गावातील सर्व मुलांना दहावीपर्यंत शिक्षणाची सक्ती, १०० टक्के साक्षरता अन् व्यसनमुक्ती यावर भर देतानाच युवा स्वयंसेवकांची आरोग्य ब्रिगेड तयार करून आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. योगा, वॉकिंग, जॉगिंग यापैकी किमान एक व्यायाम प्रकार प्रत्येकाला करावा लागेल, अशा अटींची पूर्तता करावी लागेल. गुन्हेगारीमुक्त समाजाचे स्वप्न साकारताना, स्वच्छता, पशुपालन आणि कृषीविकास यावर खासदारांनी भर द्यायचा आहे. ग्रामीण औद्योगिकीकरणाचे देशी मॉडेल राबवावे लागेल. त्यात शेण बँकेचा समावेश आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची अंमलबजावणी, ग्राम सभांचे सामाजिक अंकेक्षण, तक्रार निवारण यावरही भर द्यावा लागेल.
‘आदर्श’साठी व्यायाम, आंघोळीची अट !
By admin | Updated: December 2, 2014 04:20 IST