मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रक्रियेची पहिली कट आॅफ सोमवारी जाहीर झाली. आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांना ज्या कॉलेजच्या लिस्टमध्ये नाव आले आहे, तिथे ५० रुपये भरून प्रवेश कन्फर्म करणे बंधनकारक आहे. त्यासाठी मंगळवारी बहुतांश कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.पहिल्या कट आॅफमध्ये नाव आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश कन्फर्म करण्यासाठी २३, २४ आणि २५ जून सकाळी १० ते दुपारी ३ वाजेदरम्यानची वेळ देण्यात आली आहे. त्यानुसार मंगळवारी विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात गर्दी केली होती. प्रवेश कन्फर्म करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची चौकशी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने अधिक होती. कारण प्रवेश नक्की न करणारा विद्यार्थी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडणार आहे. त्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या कट आॅफमध्ये त्याला प्रवेश घेता येणार नाही. शिवाय त्या विद्यार्थ्याला शेवटची कट आॅफ लागल्यानंतर होणाऱ्या आॅफलाइन पद्धतीने मिळेल त्या कॉलेजला प्रवेश घ्यावा लागणार आहे. पहिल्या कट आॅफमध्ये सुमारे ९४ टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. त्यात ५० हजार ८८८ विद्यार्थ्यांना आवडीचे कॉलेज मिळाले आहे तर उरलेल्या ६ टक्के विद्यार्थ्यांना दुसऱ्या कट आॅफनंतर निश्चित प्रवेश मिळेल, असा विश्वास शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. उरलेले विद्यार्थी आणि पहिल्या यादीत आवडीचे कॉलेज न मिळालेल्या विद्यार्थ्यांसमोर अद्याप दुसऱ्या व तिसऱ्या यादीचा पर्याय खुला आहे. (प्रतिनिधी)
अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग
By admin | Updated: June 24, 2015 02:25 IST