ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 6 - इंग्लंडमधील भारतीय वंशाच्या 12 वर्षीय मुलीने अल्बर्ट आईनस्टाईन आणि स्टीफन हॉकिंग यांना मागे टाकलं आहे. या मुलीने आईनस्टाईन आणि स्टीफन हॉकिंग यांच्यापेक्षाही दोन अंकांनी जास्त म्हणजे 162 एवढा आयक्यू (बुद्ध्यांक) मिळवला आहे. या मुलीला मुख्य सोसायटीची सदस्य म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. राजगौरी पवार असं या मुलीचं नाव आहे.
राजगौरी पवारने गेल्या महिन्यात मॅन्चेस्टर येथे पार पडलेल्या ब्रिटिश मेन्सा आयक्यू टेस्टमध्ये सहभाग घेतला होता. या टेस्टमध्ये तिने 162 अंक मिळवले. तिने मिळवलेले अंक 18 वर्षाहून कमी वयाच्या मुलांमधील सर्वाधिक आहे. आता राजगौरीला प्रतिष्ठीत "ब्रिटिश मेन्सा आयक्यू" मध्ये सामील होण्यासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे. हाय आयक्यू असणाऱ्या व्यक्तींना ही मेंबरशीप देण्यात येते. माझ्या देशाचं प्रतिनिधित्व मला परदेशात करायला मिळत असल्याचा अभिमान असल्याचं राजगौरीने म्हटलं आहे.
"या मुलीकडे विलक्षण बुद्दीमत्ता आहे, कारण जगभरातील फक्त 20 हजार लोकच इतके गुण मिळवण्यात यशस्वी होतात", असं मेन्साने सांगितलं आहे. राजगौरीच्या वडिलांनी यासाठी तिची शाळा आणि शिक्षकांचे आभार मानले असून त्यांच्याशिवाय हे शक्य नव्हतं अशी प्रतिक्रिया दिली आहे.
राजगौरी पवार ही मूळची पुण्याची आहे. तिचे वडील डॉक्टर सूरजकुमार पवार मॅन्चेस्टर विद्यापीठात रिसर्च साइंटिस्ट आहेत. राजगौरीचं कुटुंब मूळ पुण्याचं आहे.