मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकांत मतदान यंत्रांत(ईव्हीएम) फेरफार करण्यात आल्याचा आरोप भाजपा वगळता सर्वपक्षीयांनी केला आहे. त्याच्या निषेधार्थ पराभूत उमेदवार आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून मंगळवारी राज्यभरात ठिकठिकाणी मतदान यंत्राच्या अंत्ययात्रा काढण्यात आल्या.पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरापासून मतदान यंत्रांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. या वेळी सर्व पराभूत उमेदवारांनी फेरनिवडणुकीची मागणी केली. छत्रपती संभाजी उद्यानापर्यंत मोर्चा नेऊन तिथे मतदान यंत्रांचे दहन करण्यात आले. मोर्चात उपमहापौर मुकारी अलगुडे (काँग्रेस), स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृह नेते बंडू केमसे, नीलेश निकम (राष्ट्रवादी काँग्रेस), रूपाली पाटील, किशोर शिंदे (मनसे), दत्ता बहिरट, मिलिंद काची (काँग्रेस), धनंजय जाधव (भाजपा बंडखोर) आदी पराभूत उमेदवार सहभागी झाले होते.तर अकोल्यात यासंदर्भात भाजप वगळता अन्य राजकीय पक्षांसह अपक्ष पराभूत उमेदवारांच्या ‘ईव्हीएम’विरोधी संघर्ष कृती समितीच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘ईव्हीएम’ची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. या वेळी समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)>‘प्रशासनाचा कारभार पारदर्शीच’निवडणूक यंत्रणेचे सर्व कामकाज पारदर्शीच होते व आहे. पराभूत उमेदवारच मतदान यंत्राबाबत तक्रार व तीसुद्धा निवडणूक निकालानंतर करीत आहेत. आरोप करणारांनी ते सिद्ध करावेत. येत्या दोन दिवसांत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर मतदानाची अंतिम आकडेवारी टाकली जाईल, असे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले.
मतदान यंत्रांची अंत्ययात्रा
By admin | Updated: March 1, 2017 05:14 IST