मुंबई : मराठी विश्वकोश आणि कुमार विश्वकोश हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, जेणेकरून त्याचा फायदा खऱ्या अर्थाने खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना होईल. मराठीतील हे विश्वकोश सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्याची जबाबदारी शासनाची असून, ही जबाबदारी आम्ही नक्कीच यशस्वीपणे पार पाडू, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य आणि मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी केले. महाराष्ट्र राज्य निर्मिती मंडळातर्फे मराठी विश्वकोश खंड २० (पूर्वार्ध) चे प्रकाशन लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन आणि विनोद तावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षा डॉ. विजया वाड, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत उपस्थित होते. यावेळी मराठी कुमार विश्वकोशच्या सीडीचे प्रकाशन हे करण्यात आले.मराठी भाषेचे संवर्धन आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे असून, मराठी भाषेसाठी आग्रह धरणे आवश्यक आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. मराठी साहित्याचा दर्जा हा अतिशय सशक्त आहे़ या मराठी साहित्याचे योग्य पध्दतीने भाषांतर झाल्यास मराठी साहित्यालाही नोबेल पारितोषिक मिळू शकेल, असे मतही तावडे यांनी व्यक्त केले.मराठी राजभाषा ही ज्ञानभाषा झाली पाहिजे, त्या दृष्टीने आम्ही सकारात्मक पावले टाकत आहोत. आम्ही मराठी भाषेसाठी सर्वसमावेशक धोरण लवकरच आणणार आहोत. या धोरणासाठी आम्ही अभिप्राय मागविले आहेत. यामध्ये सामान्य माणसांचाही अंतर्भाव असला पाहिजे, हीच आमची धारणा असल्याची त्यांनी सांगितले. लवकरच प्रकाशित होणाऱ्या उत्तरार्ध खंडाच्या प्रकाशनाचे कार्यक्रम हे मोठ्या जाहीर प्रमाणात आयोजित करावेत, जेणेकरून आपली मराठी भाषा ही जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल, असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला.
विश्वकोश प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावा
By admin | Updated: January 13, 2015 05:30 IST