मुंबई : सैनिकांच्या पत्नींबाबत आक्षेपार्ह विधान करणारे भाजपा परस्कृत विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक यांना दीड वर्षासाठी निलंबित करण्यात आले. तसा प्रस्ताव विधान परिषदेत एकमताने मंजूर करण्यात आला. शिवाय, पुढील कारवाईसाठी १० सदस्यीय उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली असून, आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी ती आपला अहवाल सादर करणार आहे.भाजपा वगळता सर्वच पक्षांनी परिचारक यांच्या निलंबनावरून आक्रमक भूमिका घेऊन ३ दिवसांपासून विधान परिषदेचे कामकाज रोखले होते. गुरुवारीदेखील या मुद्द्यावरून अर्ध्या तासासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब झाले. त्यानंतर कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर सभागृह नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी परिचारक यांना दीड वर्षासाठी निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला. परिचारक यांचे वक्तव्य निंदाजनक, संतापजनक असून, त्यांच्या वक्तव्यावर समाजातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय, ते विधान परिषद सदस्याला न शोभणारे असून, त्यामुळे सर्वोच्च सभागृहाचा अवमान झाला आहे. त्यामुळे त्याची चौकशी करून परिचारक यांना बाजू मांडण्याची संधी दिली पाहिजे. यासाठी समिती नेमण्यात येत असून, लवकरात लवकर चौकशी अहवाल सभागृहासमोर ठेवला जाईल, असा प्रस्ताव पाटील यांनी मांडला. (प्रतिनिधी)दहा जणांची समितीआगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी समितीने आपला अहवाल सादर करावा, अशी दुरुस्ती विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. त्यानुसार प्रस्तावात सुधारणा करण्यात आली. या समितीत सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सभागृह नेते चंद्रकांत पाटील, धनंजय मुंडे, नारायण राणे, सुनील तटकरे, शरद रणपिसे, नीलम गोऱ्हे, भाई गिरकर, जयंत पाटील, कपिल पाटील आदींचा समावेश आहे. सभापती तिचे अध्यक्ष असून सदस्य सचिव म्हणून विधिमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांचा समावेश केला आहे.
आमदार परिचारक दीड वर्षासाठी निलंबित
By admin | Updated: March 10, 2017 05:33 IST