ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 19 - गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सेना, भाजपा आणि मनसेनं सभेतून एकमेकांना लक्ष्य केलं असतानाच आज प्रचाराच्या तोफाही थंडावल्या आहेत. 10 महापालिका आणि 11 जिल्हा परिषद निवडणुकांसाठी सुरू असलेल्या प्रचारतोफा म्यान झाल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काल अनेक राजकीय नेत्यांच्या तोफा धडाडल्या होत्या. सर्वच नेत्यांनी आज रोड शो आणि गाठीभेटी घेण्यावर भर दिला असून, आता राजकीय पक्षांना प्रचार करता येणार नाही. मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतदानाला काही तास शिल्लक उरले असून, आज सायंकाळी 5 वाजल्यानंतर प्रचार करता येणार नाही. त्यामुळे सकाळपासून सायंकाळपर्यंत प्रचाराचा धुरळा उडाला असून, रस्त्यांवर प्रचारफे-यांमुळे ट्रॅफिक जाम होण्याची समस्या उद्भवली होती. मात्र संध्याकाळनंतर राजकीय नेत्यांच्या छुप्या प्रचाराला सुरुवात होईल. 21 तारखेला मंगळवारी मतदान होणार असून, 23 फेब्रुवारी म्हणजेच गुरुवारी मतमोजणी केली जाणार आहे.
निवडणूक प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या
By admin | Updated: February 19, 2017 19:10 IST