ठाणे : मुंबईला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी पडवळनगर परिसरात फुटल्यामुळे ठाण्याच्या वर्तकनगर, शिवाईनगर तसेच किसननगर परिसरांतील सुमारे आठ हजार कुटुंबीयांना गेल्या दोन दिवसांपासून फटका बसला आहे. रविवारी दिवसभर ठाणे महापालिकेने म्हाडासह ठिकठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केल्यामुळे रहिवाशांना दिलासा मिळाला. तरीही, अनेकांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली, तर अनेक भागांतील रहिवाशांना वाडा, मोखाड्याप्रमाणे पाण्यासाठी भटकंती करावी लागली. ठाणे शहरातून जाणाऱ्या या १८०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून मुंबईप्रमाणेच ठाण्यातील नवीन म्हाडा वसाहत, वर्तकनगर पोलीस वसाहतीच्या १० इमारतींसह शिवाईनगरच्या भागाला सहा इंचांच्या दोन जोडण्यांमधून पाणी पुरविण्यात येते. त्यामुळे ही जलवाहिनी फुटल्यानंतर मुंबईच्या पाणीपुरवठ्यात अंशत: कपात करण्यात आली तर ठाण्यातील या भागातील रहिवाशांना पाणीच मिळाले नाही. त्यामुळे या रहिवाशांना ठाणे महापालिकेच्या टँकरवर अवलंबून राहावे लागेल. महापालिकेने या भागासाठी १० ते १२ टँकरचा पाणीपुरवठा केला होता. (प्रतिनिधी)
आठ हजार घरांनी सोसली पाणीकपात
By admin | Updated: March 30, 2015 02:38 IST