जेजुरी : ‘‘जीवनात यशस्वी व्हायचे, भावी पिढी चांगली निर्माण करायची असेल तर शिकलेच पाहिजे, शिक्षणाला पर्यायच नाही. शिक्षण हीच खरी संपत्ती असून आपणास घडवणारे शिक्षक हेच गुरू आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्याचे नियोजन करा,’’ असे प्रतिपादन उद्योजक पांडुरंग सोनवणे यांनी केले. येथील ए. सी. हुंडेकरी महाविद्यालयाच्या वतीने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून इयत्ता ११वीतील विद्यार्थ्यांचे स्वागत तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. येथील कापड व्यावसायिक कावेरी कलेक्शनचे रामदास दोशी यांनी गणवेश, तर उद्योजक पांडुरंग सोनवणे यांनी शालेय साहित्य दिले. आज त्यांच्याच उपस्थितीत गणवेश, शालेय साहित्य यांचे वाटप आणि नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य रा. वि. शिशुपाल अध्यक्षस्थानी होते. या वेळी ‘लोकमत’चे तालुका प्रतिनीधी बी. एम. काळे, उद्योजक आनंद नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात २० विद्यार्थ्यांना गणवेश, तर २५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.विद्यार्थ्यांनीही गुरुजनांबाबत आपले विचार प्रकट केले. या वेळी महाविद्यालयातील प्रा. महेश तांबे, रामचंद्र भगत, संजय बोबडे, बाळासाहेब गावडे, कांचन निगडे, सारिका बर्गे, के. एस. कुंभार, दीपाली दिवाने आदी शिक्षकवृंद उपस्थित होता. या वेळी प्राचार्य रा. वि. शिशुपाल, बी. एम. काळे यांची ही भाषणे झाली.विभागप्रमुख उदयकुमार कोडग यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. प्रा. बालाजी दहीफळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश बोबडे यांनी आभार मानले.
‘शिक्षण हीच खरी संपत्ती’
By admin | Updated: July 20, 2016 01:31 IST