मुंबई : टोल नाक्यांवर लागणाऱ्या लांबच लांब रांगा कायमच्या बंद व्हाव्यात आणि त्याद्वारे वेळेची बचत होऊन, प्रदूषण टळावे याकरता राष्ट्रीय महामार्गावर ई-टोल वसुली सुरू करण्यात आली असून महाराष्ट्रातील इतर टोलनाक्यांवरही अशी सेवा सरू करण्यास आपण सहकार्य करू, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे पत्रपरिषदेत सांगितले.मुंबईच्या प्रवेशद्वारावरील एरोली पुलावर बुधवारपासून ई-टोल वसुली सुरू करण्यात आली आहे. राज्यातील सर्व नाक्यांसाठी गडकरी यांनी सहकार्याचा हात पुढे केला. ते म्हणाले, आज आपण विमानातून येताना वाशी पुलावरील वाहनांची रांग बघितल्यानंतर ई-टोलसाठीचे तंत्रज्ञान राज्याला देण्याची आपली इच्छा झाली. या पद्धतीत वाहनांना रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डिव्हाईसचे स्टिकर लावले जाते. नाक्यावरून हे वाहन गेले की वाहनधारकाने दिलेल्या खात्यातून टोलची रक्कम वजा होते. महाराष्ट्रात येत्या दोन वर्षांत एक लाख कोटी रुपये खर्चून दर्जेदार रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येईल. आपल्या विभागातर्फे देशभरात सध्या ३ लाख ८० हजार कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे येत्या सहा महिन्यांत सुरू करण्यात येतील, अशी माहितीही त्यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)
महाराष्ट्रातही ई-टोल
By admin | Updated: June 4, 2015 04:17 IST