ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - जैन धर्मियांच्या पर्युषणाच्या काळात मीरा भाईंदरमध्ये आठ दिवसांसाठी मांसविक्रीवर बंदी घातल्यानंतर आता मुंबईतही या कालावधीत मांसविक्रीवर बंदी घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत. भाजपाने थेट १० दिवसांसाठी मांसविक्रीवर बंदी घालण्याचा प्रयत्न केला असला तरी शिवसेना, मनसेसह सर्वच पक्षांनी याला कडाडून विरोध दर्शवल्याने भाजपाला नमती भूमिका घ्यावी लागली आहे. आता भाजपाने ३ दिवसांसाठी मांसविक्रीवर बंदी टाकावी अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
१० ते २८ सप्टेंबर या कालावधीत जैन धर्मियांचा पर्युषण असून या कालावधीत जैन धर्मिय उपवास करतात. पर्युषणाच्या कालावधीत २ दिवसांसाठी मांसविक्रीवर बंदी टाकण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला होता. मात्र मीरा भाईंदर महापालिकेने दोन दिवसांपूर्वी पर्युषणाच्या कालावधीत थेट ८ दिवसांसाठी मांसविक्रीवर बंदी टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मीरा भाईंदरमध्ये भाजपाची सत्ता असून या निर्णयामुळे वाद निर्माण झाला आहे. मीरा भाईंदरपाठोपाठ मुंबई महापालिका हद्दीत पर्युषणादरम्यान १० दिवसांसाठी मांसविक्रीवर बंदी टाकण्यासाठी भाजपाचे जोरदार प्रयत्न सुरु होते. मात्र शिवसेना, मनसे व भाजपातील काही नेत्यांनीच याला कडाडून विरोध दर्शवला होता. वाढत्या विरोधामुळे हा प्रस्ताव महापालिकेत मंजुर होणे जवळपास अशक्य होते. त्यामुळे भाजपाने अखेर नमती भूमिका घेत ३ दिवसांसाठी मटणविक्रीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. यापूर्वीही पर्युषणा दरम्यान तीन दिवसांसाठीच मांसविक्रीवर बंदी घातली जायची.
दरम्यान, कोणी काय खावे हे भाजपाने शिकवू नये असा खोचक टोला शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी लगावला आहे. तर भाजपाने त्यांचे नामकरण भारतीय जैन पक्ष असे करावे असा चिमटा मनसेने काढला आहे.