वाडा : तालुक्यात पूर्वी मोठ्या प्रमाणावर होणारी भातशेती आता परवडत नसल्याने त्याला पूरक पशुपालनाचा व्यवसाय रोडावू लागला आहे. त्यामुळे तालुक्यातील जनावरांची संख्या रोडावली असून पशुवैद्यकीय दवाखाने ओस पडले आहेत.तालुक्यात जिल्हा परिषदेचे १५ व राज्य शासनाचा एक असे १६ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. तेथे १५ वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. त्यांना सहाय्यक म्हणून १६ कर्मचारी आहेत. या माध्यमातून जनावरांच्या विविध आजारांवर उपचार करणे, लसीकरण करणे आदी कामे केली जातात. शासन यावर विविध योजनांतर्गत मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करते. पण, दिवसेंदिवस जनावरांची संख्या कमी होऊ लागल्याने योजनांची अंमलबजावणी करणे कठीण बनले आहे. पूर्वी शेतकरी शेतीसह पशुपालन व दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करत असत. दिवसागणिक वाढती महागाई, घटलेला बाजारभाव यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचे भातशेती लागवड करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे पशुपालनाचा व्यवसायही जवळजवळ संपुष्टात आला आहे. पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याकडे किमान १० जनावरे असत. आता जी काही लागवड होते, ती यांत्रिक पद्धतीने होऊ लागल्याने जनावरे पाळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे पशुधन संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. जनावरांची संख्या कमी झाल्याने पशुवैद्यकीय दवाखाने ओस पडल्याचे दिसत आहे.
वाड्यात पशुवैद्यकीय दवाखाने पडले ओस
By admin | Updated: February 23, 2015 02:48 IST