लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शहर-उपनगरांत मुसळधार पावसाने विजेच्या कडकडाटासह हजेरी लावल्याने मुंबईकर सुखावले. मात्र, पहिल्याच मुसळधार पावसात मध्य रेल्वेचा खोळंबा झाल्याचे दिसून आले. रविवार असल्याने लोकल संख्येच्या फेऱ्यांची संख्या कमी होती, त्यातच मुसळधार पावसाने मध्य रेल्वेच्या विशेष लोकल सेवेला ‘ब्रेक’ लागला. दरम्यान, शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्यांना लेटमार्क लागला.बहुप्रतीक्षेनंतर मुसळधार पावसाने शहरात दमदार हजेरी लावली. शनिवारपासून सुरू झालेल्या पावसाने रविवारी सकाळीदेखील जोर कायम ठेवल्याने, मध्य रेल्वेच्या ठाणे-कळवा स्थानकांतील रूळ पाण्याखाली गेले. त्यामुळे अप-धिम्या मार्गावरील वाहतूक अप जलद मार्गावर वळविण्यात आली. पावसामुळे हार्बरसह ट्रॉन्स हार्बर सेवेलाही फटका बसला. परिणामी, त्या मार्गावरील लोकल संथगतीने स्थानकांवर पोहोचत होत्या. रविवारी दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा मंदावला. तथापि, मध्य रेल्वेवरील ठाकुर्ली स्थानकांवर सहा तासांचा विशेष ब्लॉकमुळे, मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक ठप्प झाली होती. विशेष लोकल पावसामुळे अतिशय धिम्या गतीने पुढे जात असल्याने लोकलमध्ये प्रवाशांचे हाल झाले.
पावसाने मरेचा खोळंबा
By admin | Updated: June 26, 2017 02:48 IST