पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीतर्फे फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शुल्क केवळ आॅनलाईन पद्धतीने स्वीकारले जात आहे. मात्र, दोन ते तीन वेळा आॅनलाईन शुल्क भरूनही महाविद्यालयाच्या खात्यात हे शुल्क जमा होत नसल्याने पालक त्रस्त झाले आहेत. मात्र, विद्यार्थी-हितासाठीच आॅनलाईन पद्धतीने शुल्क आकारणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, ९० टक्के विद्यार्थ्यांचे शुल्क जमा झाले आहे, असा दावा डीईएसच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे.डेक्कन एज्युकेशन सोसायटीतर्फे यंदा प्रथमच विद्यार्थ्यांचे शुल्क आॅनलाईन पद्धतीने स्वीकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. फर्ग्युसनमधून अकरावी उत्तीर्ण होऊन बारावीत गेलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क गेल्या आठवड्यापासून आकारले जात आहे. अनुदानित वर्गातील विद्यार्थ्यांचे शुल्क ४ हजार रुपये असून विनाअनुदानित वर्गाचे शुल्क ३६ हजार आहे. काही पालकांनी आॅनलाईन पद्धतीने शुल्क भरले. त्यांच्या खात्यातून शुल्काची रक्कम वजा झाली; मात्र महाविद्यालयाकडे ती रक्कम जमा झाली नसल्याचे पालकांना सांगितले जात आहे. तसेच, शुल्क भरण्यात अडचण येत असल्याने काही दिवसांपासून दररोज ४० ते ५० पालक दूरध्वनीवरून महाविद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडे तक्रार करीत आहेत. तसेच प्रत्यक्षात येऊन भेटत आहेत. मात्र, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून त्यांना उद्धटपणाची वागणूक दिली जात आहे. डीईएसचे सचिव आनंद भिडे म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांना रांगेत उभे राहून पैसे भरण्यास वेळ लागत होता. त्यामुळे विद्यार्थी-हित विचारात घेऊन आॅनलाईन पद्धतीने रक्कम भरण्याची प्रक्रिया राबविली जात आहे.‘‘९ मेपासून अत्तापर्यंत ९५३ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. सुमारे १२० विद्यार्थ्यांना अद्याप आॅनलाईन पद्धतीने पैसे भरता आले नाहीत. काही तंत्रिक कारणांमुळे पालकांना पैसे भरण्यात अडचणी येत असलीत तर त्या दूर केल्या जातील. तसेच, पालकांकडून भरले गेलेले अधिक शुल्क तत्काळ परत दिले जाईल. गरज भासल्यास आॅफलाईन पद्धतीने शुल्क स्वीकारले जाईल.’’
आॅनलाईन शुल्कामुळे फर्ग्युसनचे पालक त्रस्त
By admin | Updated: May 17, 2016 01:47 IST