ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 13 - पती-पत्नीत टोकाला गेलेल्या वादानंतर रितसर फारकत घेण्यासाठी जातपंचायतीची बैठक बोलावली; परंतु त्यातही निवाडा झाला नाही. त्यामुळे संतापलेल्या सासरच्या मंडळींनी विवाहितेस जिवंत जाळून तिला नग्न करून तिचे प्रेत विहिरीत फेकले, ही थरारक घटना मंगळवारी उमापूर (ता. गेवराई) येथे उघडकीस आली.संगीता उर्फ लक्ष्मी एकनाथ कुऱ्हाडे (२२ रा. साष्टपिंपळगाव ता. अंबड, जि. जालना, हमु गुळज ता. गेवराई) असे मयत विवाहितेचे नाव आहे. तीन वर्षांपूर्वी संगीताचा विवाह झाला होता. विवाहानंतर तिला मुलगी झाली. मात्र, नंतर तिचा ट्रॅक्टरसाठी माहेराहून पैसे आणत नाही म्हणून छळ सुरु झाला. या छळाला वैतागून ती तीन महिन्यांपूर्वी गुळज येथे माहेरी आली होती. उमापूर (ता. गेवराई) हे संगीताचे आजोळ असून तेथे सोमवारी जातपंचायतीची बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी संगीता आपल्या आई- वडिलांसमवेत उमापूर येथे आजोबा शंकर कुऱ्हाडे यांच्याकडे आली होती. तेथे तिचा पती एकनाथ कुऱ्हाडे, सासरा चंद्रभान कुऱ्हाडे, सासू फुलाबाई कुऱ्हाडे हे देखील आले होते. दोन्हीकडील नातेवाईक आल्यावर शंकर कुऱ्हाडे यांच्या घरी जातपंचायतीची बैठक सुरु झाली. संगीता नांदण्यास तयार नव्हती. फारकतीनंतर सासरच्यांनी संगीताची दीड लाख रुपये देऊन ओटी भरावी (ठराविक रक्कम द्यावी) या मागणीवर तिचे वडील धोंडीराम रखवले आडून बसले होते. त्यानंतर त्यांच्यात वादावादी झाली. जातपंचायतीत शेवटपर्यंत निवाडा झालाच नाही. त्यामुळे बैठक निष्फळ ठरली. सायंकाळी सारेच शंकर कुऱ्हाडे यांच्याकडे मुक्कामी होते. रात्री सर्वांनी एकत्रित मांसाहार घेतला. मध्यरात्रीनंतर सासरच्या मंडळींनी संगीताला घराच्या बाजूला नेत तिच्या अंगावर रॉकेल ओतले. तिला नग्न करुन प्रेत सार्वजनिक विहिरीत फेकले. मंगळवारी सकाळी गावातील महिला पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेल्या तेव्हा त्यांना विहिरीत प्रेत आढळले. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर नागरिक धावून आले. चकलांबा पोलिसांनी प्रेत बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी गावातीलच प्रा. आरोग्य केंद्रात नेले; परंतु तेथे वैद्यकीय अधिकारी नव्हते. त्यामुळे अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उत्तरीय तपासणी करुन सायंकाळी प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले.धोंडीराम रखवले यांच्या फिर्यादीवरुन चंकलांबा ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. शंकर कुऱ्हाडे हा मयत संगीताचा आजोबा होता, तसेच तो नात्याने तिचा पती एकनाथचा मामा होता. त्याच्या घरी घटना झाल्याने त्यालाही आरोपी केले आहे. चारही आरोपींना मंगळवारी गेवराई न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १५ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तपास सहायक निरीक्षक दिलीप तेजनकर करत आहेत.