महापालिका दवाखान्यातील कर्मचाऱ्यांची अनास्था
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २१ - प्रसूतीचा क्षण जवळ आला असतानाही केवळ नाव नोंदविले नाही म्हणून दवाखान्यात न घेतल्याने एका महिला दवाखान्यासमोरील रस्त्यावरच प्रसूत झाली. परिसरातील महिलांनी चादरी, साड्या आणून तिची प्रसूती केली. एखाद्या सिनेमातील प्रसंग वाटावा अशी घटना आज सकाळी महापालिकेच्या चन्नवाबाई चाकोते प्रसुतीगृहासमोर घडली.
मड्डी वस्ती येथील एका गरोदर महिलेचे पोट दुखू लागल्याने तिच्या नातेवाईकाने चाकोते प्रसुतीगृहात दाखल करण्यासाठी नेले. त्या महिलेने पूर्वी नाव नोंदविले नव्हते. या एकाच तांत्रिक मुद्यावरून या प्रसुतीगृहातील परिचारिकांनी तिला दाखल करून घेण्यास नकार दिला आणि तिला शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. महिला काही क्षणात प्रसूत होईल, तुम्ही दाखल करून घ्या, अशी विनवणी महिलेच्या नातेवाईकाने केली. मात्र पैशाला चटावलेल्या कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करीत, त्यांना तातडीने जाण्यास सांगितले. दुर्देवाने त्यावेळेस रिक्षाही उपलब्ध नव्हती. हा गोंधळ सुरु असतानाच ती महिला चालत रस्त्यावर आली आणि त्याच ठिकाणी तिची प्रसूती झाली. हा प्रकार पाहिल्यावर प्रसुतीगृहाच्या परिसरातील महिला धावत आल्या. त्यांनी घरातील साड्या, चादरी आणून त्या महिलेची प्रसुती केली.
हा प्रकार समजल्यावर प्रभागाच्या नगरसेविका कुमद अंकाराम त्या ठिकाणी आल्या. त्यांनी या प्रकाराबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली. यापूर्वीही अशा अनेक घटना या प्रसुतीगृहात झाल्या आहेत. मात्र ढिम्म प्रशासन संबंधितांवर काहीच कारवाई करत नाही, असा आरोप त्यांनी केला. महापौर प्रा. सुशीला आबुटे एका कार्यक्रमासाठी त्याच परिसरात होत्या. त्यांनीही घटनास्थळी भेट दिली आणि संबंधित कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.
निर्लज्जपणाचा कळस
इतक्या घडामोडी होऊनही त्याचा कर्मचाऱ्यांवर काहीच परिणाम झाल्याचे दिसून आले. दोनशे रुपये घेतल्यानंतरच त्या महिलेला दवाखान्यात दाखल करून घेतल्याचे नातेवाईकांनी पत्रकारांना सांगितले. हा प्रकार म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.