मुंबई : उन्हाळ्याच्या या कालावधीत गावखेड्यांतील कच्च्या रस्त्यांलगत फुफाट्याचे वातावरण काही नवीन नाही. मात्र मुंबई, ठाणे जिल्ह्यांतील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांसह कायम आर्द्रता राहणाऱ्या खाडीक्षेत्रातील वातावरणात धुळीचे साम्राज्य व धुके रविवारी मोठ्या प्रमाणात पसरल्यामुळे नागरिकांमध्ये तर्कवितर्क काढले जात आहेत. दूरदूरपर्यंत स्पष्ट दिसणाऱ्या वातावरणाची जागा आज दुपारनंतर धुळीचे कण, धुक्याने घेतल्यामुळे दूरवरच्या उंच इमारती, रस्त्यांवरील वाहने या धुक्यामुळे स्पष्ट दिसत नव्हती. हवेतील आर्द्रता व दमटपणा वाढल्यामुळे नागरिक घामाघूम झाले होते. या धुक्यामुळे वादळवाऱ्याची स्थिती उद्भवणार की काय, अशा चर्चा या कालावधीत होत्या. आज दिवसभर तापमान जास्तीतजास्त ३१.४ अंश सेल्सिअस तर कमीतकमी २५ अंश सेल्सिअस तापमान व हवेत ६८ टक्के आर्द्रता असल्याचीनोंद कुलाबा वेधशाळेने नोंदवली आहे. हीच स्थिती सांताक्रूझमध्ये जाणून घेतली असता तापमान जास्तीतजास्त ३२.३ ते कमीतकमी २३.३ अंश सेल्सिअस असून ६४ टक्के आर्द्रता असल्याची नोंद करण्यात आली आहे. या धुक्यामुळे धुळीचे कण वातावरणात पसरल्यामुळे गाड्यांच्या काचा, मोबाइल स्क्रीन, गॉगल, चश्म्याच्या काचांवर काही क्षणात धूळ साचत असल्यामुळे ती सतत साफ करावी लागत होती. (प्रतिनिधी)
महामुंबईला धुळीचा तडाखा
By admin | Updated: April 6, 2015 04:22 IST