मुंबई : दमट वाऱ्यासोबत वाहणाऱ्या मुंबईत सध्या कमाल आणि किमान तापमानात तब्बल १५ अंशाचा फरक नोंदविण्यात येत असून, या फरकामुळे मुंबईकर कमालीचे त्रस्त झाले आहेत. विशेषत: दिवसा तप्त ऊन आणि रात्री वाहणारे थंड वारे; अशा दुहेरी वातावरणाला मुंबईकरांना सामोरे जावे लागत आहे.२९ आॅक्टोबर रोजी मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात १३ अंशाचा फरक नोंदविण्यात आला होता. ३ नोव्हेंबर रोजी त्यात २ अंशानी वाढ झाली असून, सोमवारचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३७, २१.२ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. मध्यंतरी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या निलोफर या चक्रीवादळामुळे शहराचे कमाल आणि किमान तापमान खाली उतरले होते. कमाल तापमान २८ आणि किमान तापमान २४ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत होते. आता निलोफर शमून बरेच दिवस उलटल्याने कमाल तापमानात कमालीची वाढ झाली असून, गेल्या पाच दिवसांपासून शहराचे कमाल तापमान सलग ३५ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. कोकण आणि गोव्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. दरम्यान, पुढील २४ तासांत संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. पुणे व मुंबईत आकाश मुख्यत: निरभ्र राहील; आणि मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५, २० अंशाच्या आसपास राहील. (प्रतिनिधी)
दुहेरी वातावरणाने मुंबईकर झाले त्रस्त
By admin | Updated: November 4, 2014 03:09 IST