शिर्डी : तिरुपती बालाजीच्या धर्तीवर आता सातही दिवस व्हीआयपी दर्शन पास सशुल्क करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय संस्थानच्या त्रिसदस्यीय समितीने घेतला आहे़ त्यामुळे भाविकांमधील भेदभाव संपुष्टात येण्याबरोबरच त्यांची शिफारशींतून मुक्तता होणार आहे. नव्या निर्णयाची १ एप्रिलपासून अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र जाधव यांनी सांगितले़ गेल्या तीन वर्षांपासून संस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात शनिवार व रविवारी सशुल्क, तर सोमवार ते शुक्रवार व्हीआयपींचा दर्जा किंवा शिफारस बघून विनामूल्य दर्शन पास देण्यात येत होते. आरती पासेस मात्र सर्व दिवस सशुल्क होते़ याशिवाय तीन दिवस अगोदर संस्थानच्या वेबसाइटवर आॅनलाइन पासेस काढता येत असत़ गेल्या आठवड्यापासून संस्थानने तीन दिवस अगोदर पास काढण्याची अटही काढून टाकली. एकीकडे सामान्य भाविकांना आॅनलाइनच्या माध्यमातून सातही दिवस सशुल्क पासेस दिले जायचे, तर दुसरीकडे तथाकथित व्हीआयपींना केवळ पद व शिफारसीवर विनामूल्य पासेस देण्यात येत होते़ हा भेदभाव दूर करण्यासाठी व्यवस्थापनाने आॅनलाइन प्रमाणेच जनसंपर्क कार्यालयातही ओळखपत्र दाखवून सातही दिवस पासेस सशुल्क देण्याचा निर्णय घेतला़ पासेसचे दर मात्र पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आले आहेत़ भाविकांना घरबसल्या साई संस्थानच्या वेबसाइटवर सशुल्क दर्शन पासेस मिळू शकतील़ (प्रतिनिधी)१७ कोटींचे उत्पन्नगेल्या वर्षभरात जनसंपर्क कार्यालय व आॅनलाइन सेवेच्या माध्यमातून जवळपास ९ लाख ९२ हजार भाविकांनी सशुल्क दर्शन, आरतीचा लाभ घेतला़ याद्वारे संस्थानला तब्बल १७ कोटी ९२ लाखांचे उत्पन्न मिळाले़ तर जनसंपर्क कार्यालयामार्फत ४ लाख ४५ हजार व्हीआयपींनी फुकट दर्शनाची संधी साधली होती़
साईदर्शनातील भेदभाव संपुष्टात!
By admin | Updated: March 24, 2015 01:47 IST