डोंबिवली : दोन वर्षांची मुलगी कल्याण रेल्वे स्थानकात सापडली. परंतु सुरक्षा आणि वैद्यकीय यंत्रणा यांच्यातील बेपर्वाईमुळे तिला अनेक ठिकाणी वैद्यकीय तपासणीसाठी नेल्यामुळे तिची परवड झाली.स्थानकातील पश्चिमेकडील भागात असलेल्या तिकीट आरक्षण केंद्रात ही मुलगी भाविक पांचाळ या युवकाला दिसली. त्याने आधी रेल्वे पोलीस दल (आरपीएफ)शी संपर्क साधला मात्र तेथे सहकार्य न मिळाल्यावर त्याने संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास मुलीला घेऊन कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात त्याबाबतची माहिती वरिष्ठ लोहमार्ग पोलिस निरिक्षक सोमनाथ तांबे यांना दिली.मुलीची सर्व माहिती घेत पांचाळ याच्याकडून तीला येथिल रुक्मिणीबाई इस्पितळात दाखल केले. तेथे वैद्यांशी तपासणी करुन तांबे यांनी तीला भिवंडीच्या बाल समाज कल्याण केंद्रामध्ये पाठवले, मात्र तेथे मुलीच्या तब्येतीच्या कारणास्तव तीला पुन्हा कल्याणला आणले गेले. त्या ठिकाणी पुरेशा सुविधा नसल्याने लोहमार्ग पोलिसांनी तीला सायन इस्पितळात दाखल केले असून शनिवारी रात्री उशिरापर्यंत तिची तब्येत योग्य असल्याच्या वृत्ताला तांबे यांनी दुजोरा दिला.दरम्यान जीआरपी की आरपीएफ या सुरक्षा यंत्रणेतील फरकच या युवकाला न समजल्याने तिची परवड झाल्याचा दावा तांबे यांनी केला. त्यामुळे प्रसिद्धी माध्यमांचा गोंधळ झाला, प्रत्यक्षात आरपीएफ ने त्यांना काय वागणूक दिली हे कळू शकले नाही. परंतु पावणेसातला जेव्हा मुलीला तो जीआरपीकडे घेऊन आला त्यानंतर मात्र तातडीने सर्व हालचाली करण्यात आल्या.
हरवलेल्या चिमुरडीची यंत्रणांतील गोंधळामुळे परवड
By admin | Updated: September 8, 2014 03:05 IST