ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे साधेपणाने राहण्यासाठी ओळखले जात असले तरी रविवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामुळे मुंबईकरांना मनस्ताप सोसावा लागला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे.
मुंबईतील वरळी येथे नॅशनल स्पोर्ट्स क्लब येथे कर्करोग पिडीत रुग्णांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी क्लब बाहेरील वाहतूक रोखून धरली. यामुळे परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने संतप्त वाहनचालकांनी पोलिसांशी हुज्जत घातली. संतप्त वाहन चालकांनी मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफ अडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळ हस्तक्षेप करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. पोलिसांनी नाहक वाहतूक रोखून धरल्याचा आरोप वाहन चालकांनी केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांना झालेल्या त्रासाबद्दल ट्विटरवरुन दिलगिरी व्यक्त केली. मी स्वतः व्हीआयपी संस्कृतीच्या विरोधात असून पोलिसांनी नाहक वाहतूक रोखून धरणे चुकीचे आहे. या घटनेची सविस्तर चौकशी करु असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.