पुणे : जिल्ह्यातील ७५ गावांसाठीच्या पाणीपुरवठा योजना मंजुर झाल्या आहेत. परंतु गाव हागणदारीमुक्त न झाल्याने या गावांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. पाण्याची टाकी व पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. परंतु, योजनेच्या निधीचा शेवटचा हप्ता न मिळाल्याने पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.राज्य शासनाने विकासकामांचा निधी वितरीत करताना गाव हागणदारीमुक्त असल्याची अट घातली आहे. योजना मंजूर केल्यानंतर गाव ७० टक्के हागणदारीमुक्त झाल्यानंतर पहिला हप्ता, ८० टक्क्यांनंतर दुसरा हप्ता तर ९० टक्के गाव हागणदारीमुक्त झाल्यानंतर तिसरा हप्ता वितरीत करण्यात येतो. जिल्ह्यात पाणी पुरवठा विभागातर्फे भारत निर्माण, आदिवासी विकास, बिगर आदिवासी विकास व ‘एआरपी’ योजनेअंतर्गत पाणी योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सुमारे १ हजार ४०७ गावांपैकी आतापर्यंत सुमारे ६०० गावे शंभर टक्के हागणदारीमुक्त झाली आहेत. अद्यापही ५० टक्क्यांपेक्षा अधिक गावे हागणदारीमुक्त होणे बाकी आहेत. त्यामुळे प्रशासनाला विविध योजना राबविताना अनेक अडचणी येत आहेत. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन-तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात पाणी योजना मंजूर झाल्या आहेत. परंतु, गाव हगणदारीमुक्त न झाल्याने अधिकाऱ्यांना निधीचा शेवटचा हप्ता देता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यात ७५ गावांमध्ये पाण्याची टाकी, पाईपलाईन देखील पूर्ण झाली असून सुद्धा टाकीत पाणी सोडता येत नसल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)
हागणदारीमुक्ती अभावी पाणी योजना रखडल्या
By admin | Updated: April 11, 2015 02:11 IST