मुंबई : अमली पदार्थ तस्करीची पाळेमुळे शोधून ती समूळ नष्ट केली जातील. राष्ट्रीय गुन्हे शाखेकडून याबाबत कारवाई होत असून कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात येईल, असे गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले.अमली पदार्थ तस्करांकडून मुंबई, पुणे तसेच राज्यातील अन्य महत्त्वाच्या शहरांत शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जाण्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य बाबुराव पाचर्णे यांनी उपस्थित केला होता. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार आदींनी या चर्चेत भाग घेतला. त्याला उत्तर देताना पाटील बोलत होते.कोकेन आणि हेरॉइनइतकेच आरोग्याला अपायकारक असलेले म्यॉव म्यॉव किंवा एमडी असे तुलनेने स्वस्त पदार्थ विकण्यासाठी तस्करांनी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लक्ष्य केले. तथापि, या तस्करीसंदर्भात नॅशनल क्राईम ब्युरोने कारवाई करून आंतरराज्यीय तस्करांना गजागाड केले आहे, असेही पाटील यांनी सांगितले.तस्करी रोखण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा- अमली पदार्थ तस्करी समूळ नष्ट करण्यासाठी शासनाने स्वतंत्र यंत्रणा कार्यरत केली असून, पाच युनिट स्थापन केले आहेत. - अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करण्यात आले असून, कायद्यानुसार कडक कारवाई करून लवकरच यावर नियंत्रण आणण्यात येईल, असेही पाटील यांनी सांगितले.
राज्यातील अमली पदार्थ तस्करी समूळ नष्ट करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2017 00:48 IST