मुख्य सचिवांकडून चौकशीनागपूर : सरकारी विश्रामगृहावर दारू पिऊन धिंगाणा घालत कर्मचाऱ्यांना मारहाण करणारे कामगार विभागाचे प्रधान सचिव अरविंदकुमार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. त्यांच्याजागी सिकॉमचे बलदेवसिंग हे गुरुवारी सूत्रे हाती घेणार आहेत. या धिंगाण्याचे वृत्त बुधवारी लोकमतने दिले होते. केंद्र सरकारच्या, ‘नीरी’या संशोधन संस्थेच्या विश्रामगृहावर अरविंदकुमार यांनी दारू ढोसून मंगळवारी मध्यरात्री आणि बुधवारी रात्री प्रचंड गोंधळ घातला होता. आपल्या विभागाच्या तीन कर्मचाऱ्यांना चपलेने मारले. नीरीच्या कर्मचाऱ्यांनादेखील मारहाण केली आणि धमक्या दिल्याचे आरोप आहेत. त्यांच्या या गैरवर्तनावरून कामगार विभागात संतापाची लाट उसळली असून कर्मचाऱ्यांनी अप्पर कामगार आयुक्त कार्यालयात आज दुपारी जोरदार निदर्शने केली.(प्रतिनिधी) सीसीटीव्हीत कारनामे कैदअरविंदकुमार यांनी दोन रात्री जे असभ्य वर्तन केले ते सगळे विश्रामगृहावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आले आहेत. मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय हे अरविंदकुमार यांच्या गैरवर्तनाची चौकशी करणार असून त्यांनी मागणी केल्यास सीसीटीव्ही फुटेज शासनाला सोपविण्याची तयारी नीरीने दर्शविली असल्याचे सूत्रांनी सांगितले. अरविंदकुमार यांनी काल सकाळी कामगार मंत्री प्रकाश मेहता यांच्या बंगल्यावर अप्पर कामगार आयुक्त अनिल लाकसवार यांच्याशी बोलताना घाणेरडे शब्द वापरल्याचे समजते. लाकसवार यांच्या बदलीचा आदेश काढून त्यांच्याजागी उपसचिव गुप्ते यांना अरविंदकुमार आणू इच्छित होते पण कामगार मंत्र्यांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. अरविंदकुमार हे एका राज्यात निवडणूक निरीक्षक म्हणून गेले आणि तिथे त्यांनी एका कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. या प्रकरणात ते निलंबित झाले होते पुढे ते सेवेत परतले.
दारुडे प्रधान सचिव सक्तीच्या रजेवर
By admin | Updated: December 11, 2014 00:52 IST