मुंबई : जे.जे. रुग्णालयातील नेत्ररोग विभागातील विद्यार्थ्यांनी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने आणि डॉ. रागिणी पारेख यांच्याविरुद्ध केलेली तक्रार मागे घेतली आहे. या विद्यार्थ्यांनी तक्रार मागे घेत असल्याचे लेखी निवेदन समितीला दिले आहे. नेत्ररोग विभागातील डॉक्टरांनी डॉ. लहाने आणि डॉ. रागिणी त्यांचा मानसिक छळ करत असल्याचे तसेच रागावण्यासाठी अपशब्द वापरत असल्याची तक्रार २०१६ मध्ये केली होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाचे तत्कालीन मंत्री विनोद तावडे यांनी एक समिती स्थापन करून चौकशीचे आदेश दिले होते. डॉ. रागिणी आणि डॉ. लहाने यांच्या वर्तनात बदल न झाल्यास कारवाईची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. तक्रारकर्त्या विद्यार्थ्यांनी ही तक्रार मागे घेऊन गेल्या आठ महिन्यांत आपला कोणताही छळ झालेला नसल्याचे म्हटले आहे. (प्रतिनिधी)
डॉ. लहाने, डॉ. पारेख यांच्याविरुद्धची तक्रार मागे
By admin | Published: January 20, 2017 5:11 AM