ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ८ - डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा तपास योग्य दिशेने सुरु असून लवकरच दाभोलकरांचे मारेकरी पकडले जातील असे राज्य सरकारने उच्च न्यायालयात सांगितले असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यायची गरज नाही असे सरकारने न्यायालयासमोर म्हटले आहे.
अंधश्रध्देविरोधात लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पुण्यात भररस्त्यात हत्या झाली होती. हत्येला नऊ महिन्यांचा कालावधी लोटला तरी दाभोलकरांचे मारेकरी मोकाट आहेत. या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून काढून सीबीआयकडे द्यावा अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्चन्यायालयात दाखल झाली होती. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. राज्य सरकारच्या वकिलांनी उच्च न्यायालयासमोर दाभोलकरांच्या हत्येचा तपास योग्य दिशेने सुरु असून या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसचं करतील असे न्यायालयाला सांगितले. या प्रकरणात पुणे पोलिसांचे वाभाडे निघाले असून मारेकरी अद्याप पकडले गेलेले नाहीत. तर ज्या दोघा आरोपींना ठाण्याहून अटक करण्यात आली त्या आरोपींनादेखील जामीन मिळाला आहे.